महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज ७९ वी जयंती
◻️ ‘विलासराव आणि मी’.. जेष्ठ साहित्यिक डॉ. संतोष खेडलेकर यांच्या आठवणीतील विलासराव!
कला, साहित्य, संस्कृती यावर मनापासून प्रेम करणारे जे मोजके मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले त्यात आवर्जून उल्लेख करावं असं नाव म्हणजे विलासराव देशमुख. मागच्या काही वर्षात राजकारणाचा एकूणच पोत बदलला आहे. वेगवेगळ्या अस्मितांचे राजकारण सुरू झाले आहे. अशा अस्मितांच्या गदारोळात विलासराव देशमुख यांची प्रकर्षाने आठवण येते.
सन २००० साली अहमदनगरला मराठी पत्रकारांचे राज्यपातळीवरील अधिवेशन झाले होते. त्यावेळी नगरचे पत्रकार मित्र सुधीर मेहता यांच्या पुढाकारातून माझ्याकडे असलेल्या जगभरातल्या विविध दैनिकांचे प्रदर्शन भरवले होते. सहकार सभागृहात अधिवेशन आणि तिथून जवळच असलेल्या महावीर कलादालनात माझ्याकडील निवडक चारशे साडेचारशे दैनिकांचे प्रदर्शन.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख उपस्थित होते. मी प्रदर्शन हॉलमध्ये होतो. तेवढ्यात सुधीर मेहतांचा निरोप आला पटकन सहकार सभागृहाच्या स्टेजवर या. मी घाईघाईने गेलो, सुधीर मेहतांनी मला स्टेजवर घेतले आणि माझ्या वृत्तपत्र संग्रहाबद्दल जाहीर माहिती देऊन विलासराव देशमुख यांच्या हस्ते माझा सत्कार केला. जेमतेम एखादा मिनिटं मी आणि विलासराव समोरासमोर होतो. तेवढ्यात मी त्यांना प्रदर्शनाला भेट द्यायची विनंती केली. त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेत महावीर कलादालनाला भेट देण्याचा विषय नव्हता मात्र आश्चर्य म्हणजे विलासरावांनी माझी विनंती तात्काळ मान्य केली.
मी सत्कार स्वीकारून लगेच प्रदर्शन हॉलकडे आलो. थोड्याच वेळात विलासराव आले, मला सोबत घेऊन वृत्तपत्रे मांडलेल्या एकेका भागाला भेट देत होते, मध्येच छानशी कमेंट करीत होते. एका ठिकाणी अचानक विलासराव क्षणभर थबकले.. त्यांनी डोळे मिटले आणि सुस्कारा टाकीत बारकाईने तिथली वर्तमानपत्र बघायला लागले. त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘हे सगळं मी बघितलं आणि अनुभवलं आहे’ समोर लातूर आणि किल्लारीच्या भूकंपाच्या काळातील वेगवगळे पेपर एका क्रमाने लावलेले होते.
पुढे काही वर्षांनी मी ‘कांताबाई सातारकर’ हे पुस्तक लिहिलं आणि तमाशाशी जोडलो गेलो. त्यादरम्यान काहीकाळ सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री होते. त्यांनी तमाशा क्षेत्रात काम करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीला शासनाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार देण्यात येईल असे जाहीर केले. शिंदेंच मुख्यमंत्रीपद गेलं आणि हा विषय बाजूला पडला.
दरम्यान मी तत्कालीन सांस्कृतिक मंत्री अशोक चव्हाण, आर. आर. पाटील आणि मुख्यमंत्री विलासराव यांना याबाबत अनेक पत्र लिहिली, तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्याबाबत व हा पहिला पुरस्कार कांताबाई सातारकर यांना द्यावा असही वारंवार लिहित होती. दरम्यान काय घडलं हे माहीत नाही. इतरांनीही हा लावून धरला होताच. एक दिवस कांताबाईंना हा पुरस्कार जाहीर झाला आणि तत्कालीन सांस्कृतिक सचिव अजय आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची तयारी सुरू झाली.
मंत्रालयातून मला फोन यायचा फोटो पाठवा, मानपत्रासाठी मुद्दे पाठवा (त्यानंतर या पुरस्कार सोहळ्याची अनेक मानपत्र लिहिण्याची संधी शासनाकडून मिळाली) याच कार्यक्रमात मी माझ्या कांताबाई सातारकर या पुस्तकाचे प्रकाशन करायचे ठरवले. आंबेकर साहेबांनी तात्काळ या कार्यक्रमाला शासकीय कार्यक्रम पत्रिकेत समाविष्ट करून घेतले.
विलासराव देशमुख स्वतः नारायणगावला येऊन कांताबाईंचा सन्मान करणार होते. मी, कांताबाई आमच्या परिवारासह नारायणगावला गेलो. मुख्यमंत्री वेळेत हजर होते. कोणताही बडेजाव न मिरवता मांडवात आल्या आल्या विलासराव मी व कांताबाई बसलो होतो तिकडे चालत आले. आमच्याशी बोलले, फोटोला छानशी पोज दिली. माझ्याकडून पुस्तकाविषयी माहिती घेतली, माझ्या पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि आपल्या भाषणात भरभरून बोलले. ही माझी व त्यांची दुसरी भेट.
यानंतर चारच दिवसांनी मुंबईला ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांच्या एकसष्टी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विलासराव येणार होते. कसबे सरांच्या एकसष्टीनिमित्त प्रकाशित गौरव विशेषांकाचे संपादन मी केले होते. अंक प्रकाशनाच्या वेळी मला स्टेजवर निमंत्रित केलं गेलं, मी स्टेजवर गेलो विलासरावांच्या हातात अंक दिला आणि विलासरावांनी, ‘आपण तीन चार दिवसात दुसऱ्यांदा भेटतोय’ असं मिश्किलपणे म्हटलं. ही त्यांची स्मरणशक्ती. ही आमची तिसरी भेट.
यानंतर नाशिकला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं, समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री विलासराव होते. त्याकार्यक्रमानंतर विलासराव देशमुख, बाळासाहेब थोरात, उल्हास पवार ही मंडळी रात्री एका छोट्या विमानाने मुंबईला परत जाणार होती. साहित्य संमेलनात बाळासाहेब थोरातांची भेट झाली.
त्यांनी रात्री संगमनेरला कसा जाणार याची चौकशी केली. मी सांगितले की, मी आणि विलासराव मुंबईला जाणार आहोत आम्हाला ओझर विमानतळावर सोडून तू माझ्या गाडीने संगमनेरला जा. साहित्यसंमेलनाचा समारोप झाला. आयुष्यात पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांच्या कॅनव्हायमध्ये ओझरपर्यंतचा प्रवास केला. त्या रात्री ओझर विमानतळावर अगदी निवांतपणे कार्यकर्त्यांशी संवाद साधणारे विलासराव आजही डोळ्यासमोर दिसतात.
याखेरीज तीनदा विलासरावांना ऐकण्याची संधी मिळाली. मालपाणी उद्योग समूहाच्या शिर्डी येथील वॉटर पार्कच्या उदघाटन सोहळ्यात, संगमनेर तालुक्यातल्या दरेवाडी येथे झालेल्या एका छोट्या कार्यक्रमात आणि संगमनेरला तांबे हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यात विलासराववांचे प्रत्येक भाषण म्हणजे वक्तृत्वाचा, प्रासंगिक भाषणाचा उत्तम नमुना असायचा.
आज विलासराव देशमुख यांची वी जयंती. जर तरच्या भाषेत बोलायचे झाले तर सहज मनात एक विचार आला... आज विलासराव हयात असते सोबतीला गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन ही मंडळीही हयात असती आणि कोरोना नसता तर ..?
आज २६ मे च्या संध्याकाळी लातूरला भूतो न भविष्यती अशा चाहत्यांच्या गर्दीत विलासरावांचा अमृतमहोत्सव सोहळा झाला असता, एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी (विरोधक नव्हे) असलेल्या गोपीनाथरावांनी दिलखुलास भाषण केलं असतं... मग विलासराव भाषणाला उभे राहिले असते... उपस्थित लाखो चाहत्यांनी खास मराठवाडा स्टाईलमध्ये टाळ्या, शिट्यांचा गजर केला असता... खरंच असं घडलं असतं तर..?
डॉ. संतोष खेडलेकर
(लेखक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य तसेच जेष्ठ पत्रकार असून हा लेख त्यांनी तीन वर्षांपूर्वी लिहिलेला आहे.)