कोकणगाव शिवारात झालेल्या भीषण अपघात बाळासाहेब गिते ठार
◻️ मांचीहिल शिक्षण संकुलात करत होते चालकाचे काम
◻️ दुर्दैव म्हणतात ते हेचं का? काही मिनिटांच्या अंतराने झाला दोनदा भीषण अपघात
संगमनेर LIVE | रविवारी रात्री दुचाकी अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला संगमनेर येथे उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेची एस टी बसला समोरासमोर धडक झाल्यामुळे एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात कोकणगाव शिवारात झाला होता.
संगमनेर तालुक्यातील कोंची येथे रविवारी सायंकाळी दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात बाळासाहेब धोंडीराम गीते (रा. कोंची, ता. संगमनेर) हे गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी संगमनेरकडे आणले जात होते.
रुग्णवाहिका ही कोकणगाव शिवारात आली असता संगमनेरहून लोणीकडे जात असलेल्या जात असलेल्या एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यामुळे रुग्णवाहिकेतील रुग्ण बाळासाहेब गीते हे ठार झाले.
तर रुग्णांचे नातेवाईक गणेश गीते, संदीप गीते हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हालवण्यात आले असून घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.
दरम्यान बाळासाहेब धोंडीराम गीते हे मांचीहिल शिक्षण संकुलात ट्रॅकटर चालकाचे काम करत होते. त्यांच्या दुर्दैवी निधनाची माहिती कळताच कोंचीसह मांची पंचक्रोशीत देखील शोककळा पसरली होती.