अहिल्यादेवी होळकर यांचे संगमनेरशी आहे असे अतुट नाते!
◻️ जयंती दिनानिमित्त वाचा डॉ. संतोष खेडलेकर यांचा अप्रतिम लेख
आज अहिल्याबाई होळकर यांची जयंती. मराठेशाहीतील ज्या ज्या स्त्रियांना राज्यकारभार करण्याची संधी मिळाली त्यात अहिल्याबाई होळकर यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.
होळकर संस्थानातून पुण्याला पेशवेदरबारी जाताना अहिल्याबाई अनेकदा संगमनेरला थांबायच्या. इतिहासाची पाने चाळली असता त्यांचा संगमनेरशी पहिला संबंध आढळतो तो इथल्या श्रीराम मंदिराच्या निमित्ताने. सध्याच्या चंद्रशेखर चौक आणि परदेशपुरा परिसरात साधारणतः १७७० ते १७७५ च्या दरम्यान अहिल्याबाईंनी श्री राम मंदिर बांधले आहे.
श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेच्या अनुक्रमे ३३ इंच, ३१ इंच व २९ इंच उंचीच्या अतिशय सुबक मूर्ती त्यावेळी अहिल्याबाईनी खास तयार करून घेतल्या. या मूर्तीसमोर हनुमानही आहे. बहुतेक मंदिरांमध्ये हात जोडलेल्या हनुमानाची मूर्ती दिसते पण संगमनेरच्या मंदिरात हाती धनुष्यबाण घेतलेल्या हनुमानाची मूर्ती आहे.
हे मंदिर बांधल्यानंतर वर्षभर यथासांग पूजा अर्चा व्हावी म्हणून अहिल्याबाईंनी मंदिराचे पुजारी म्हणून रामचंद्र तात्याबा उपासनी यांना साठ रुपयांचे वर्षासन सुरू केले. रामचंद्र उपासनी हे इंदूरला रहात असल्याने त्यांनी ही जबाबदारी त्यांच्याच घराण्यातल्या एकावर सोपवली. पुढे रामचंद्र उपासनी यांचे संगमनेरला येणे जाणे कमी होत गेले. विश्वनाथ महादेव उपासनी यांनी ते हयात असेपर्यंत गावकऱ्यांच्या मदतीवर मंदिराची देखभाल केली.
अहिल्याबाईंची संगमनेरशी निगडित दुसरी आठवण म्हणजे संगमनेरचे रहिवासी असलेल्या पेशवाईतील ज्येष्ठ शाहीर अनंत फंदी यांची. अनंत फंदी लावण्या तमाशे करायचे हे धार्मिक वृत्तीच्या अहिल्याबाईंना रुचत नव्हते. अनंत फंदी हे होळकर दरबारात मानाचे स्थान असलेले कलाकार होते.
एकदा होळकर दरबारात त्यांचा तमाशा सादर झाला तेव्हा अहिल्याबाई फंदी बुवांना म्हणाल्या होत्या, ' फंदीबुवा आपण ब्राह्मण, आपल्याला सरस्वती प्रसन्न आहे, तुम्हाला साधुतुल्य वाणी लाभली आहे ती परमार्थमार्गी लावली तर किती बरं होईल '. असं म्हणतात की अनंत फंदी यांनी त्याच ठिकाणी हातातला डफ फोडला व पुढच्या काळात तमाशा न करता फक्त कीर्तन करील अशी प्रतिज्ञा केली.
दरम्यान फंदीबुवांची कीर्तने गाजू लागली. अनेकदा अहिल्याबाईंनी त्यांच्या कीर्तनांना हजेरी लावली. पुण्यात तर ते कीर्तनकार म्हणून खूपच प्रसिद्ध झाले. पुण्यातल्या बेलबागेत त्यांच्या कीर्तनांना अनेक प्रतिष्ठित मंडळी यायची.
संगमनेरला दरवर्षी शंकर महाराजांच्या मठासमोर तमाशाची हजेरी व्हायची. एका वर्षी पानोडीच्या सरदार थोरात यांनी फंदीबुवांना तमाशा सादर करण्याची गळ घातली. गावातल्या लोकांनीही आग्रह केला. अखेरीस फंदीबुवा तयार झाले.
तमाशा ऐन रंगात आला असताना अचानक अहिल्याबाईंची स्वारी संगमनेरात दाखल झाली. कुणीतरी धावत पळत जाऊन फंदीबुवांना ही बातमी सांगितली. अनंत फंदी यांचे तमाशा आणि कीर्तन या दोन्ही कलांवरचे प्रभुत्व असे की त्यांनी आहे त्याच साथीदारांसह, आहे त्याच वेशात आणि तमाशाला आलेल्या त्याच रसिकांसमोर तमाशाचे अतिशय बेमालूमपणे कीर्तनात रूपांतर केले.
अहिल्याबाई रागारागाने तिथे आल्या तर फंदीबुवा आणि समोरचे श्रोते हरी कीर्तनात रंगून गेलेले होते. अहिल्याबाई देखील ही करामत बघून खूश झाल्या त्यांनी उपस्थित समुदायासमोर फंदीबुवांचा गौरव केला.
अनंत फंदी यांनी यशवंतराव होळकर यांच्या पराक्रमावर आधारित ' सुभेदार यशवंत कन्हैया सदा फत्ते करी तलवार 'हा पोवाडाही लिहिला आहे. त्याकाळात हा पोवाडा विशेष गाजला होता.
संगमनेर आणि होळकर दरबाराचा संबंध १९१४ मध्येही आला. संगमनेरचे नरहर गंगाराम गुजर हे शीघ्रकवी म्हणून राज्यभर प्रसिद्ध होते. त्यांना होळकर दरबाराकडून दरमहा ४० रुपये मानधन दिले जायचे. याबाबत होळकर दरबाराच्या आदेशाची प्रत उपलब्ध आहे.
आज अहिल्याबाईंची जयंती, त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..!
डॉ. संतोष खेडलेकर
(लेखक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य तसेच जेष्ठ पत्रकार आहेत)