जीवनातून राम गेल्यास मर्यादेची लक्ष्मण रेषा तुम्हाला वाचवू शकणार नाही - प्रवीण ऋषींजी महाराज
संगमनेर LIVE (आश्वी) | माता सीता मृघामारीच्या लोभात अडकली आणि हरणाची होत गेली. हरणाची झाल्यापासून ती प्रभु श्रीरामपासून दुरावली आणि श्रीराम तिच्या जीवनातून लांब गेले. यामुळे माता सीतेला देखील मर्यादेची लक्ष्मण रेषा वाचू शकली नाही. त्यामुळे जीवनात मार्गक्रमण करताना तुमच्या जीवनातून राम जाऊ देऊ नका असा बहुमुल्य प्रवचनपर मार्गदर्शन जैन संत उपाध्याय प्रवीण ऋषीजी महाराज यांनी केले.
आश्वी बुद्रुक (ता. संगमनेर) येथील मुमुक्षु कु. प्रतिक्षा भंडारी ही उद्या रविवार दि. ९ जून रोजी संसार सुखाचा त्याग करुन जैन भगवती दीक्षा घेणार आहे. त्यामुळे ३१ मे पासून आश्वी बुद्रुक येथे दीक्षा महोत्सव सुरू असून यामध्ये आपल्या अमृततुल्य वाणीतून प्रवचन करताना प्रवीण ऋषीजी महाराज बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, तुमच्यातील प्रभु श्रीराम लांब जाईल तेवढी मर्यादा सुद्धा लांब जाईल. हेच माता सीतेला त्यावेळी न कळाल्यामुळे प्रभु श्रीरामापासून माता सीता दूर गेली. ज्या - ज्या वेळेस आपण आपल्या श्रद्धेला या मृगजलमय जगात हरवून बसतो. तेव्हा हे जग सुद्धा आपल्याकडे त्याच नजरेने बघत असते. त्यामुळेचं आपण आपलं सर्वस्व गमावून बसतो. हे जग जसे दिसते तसे मुळींच नाही. त्यामुळे मनुष्याला प्रत्येक वेळेस आपल्या वर्तूनिक व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. आपल्या जीवनातला श्रद्धेचा राम आपल्यापासून दूर जाऊ नये असे वाटत असल्यास जीवनात संयम बाळगा आणि लोभाला कधीही बळी पडू नका.
माता सीता ही सौभाग्यशाली होती तिला परत आणण्यासाठी प्रभु श्रीराम होते, हनुमान होते, लक्ष्मण होते आणि त्यासोबत सगळी वानर सेना पण होती. आपल्या जीवनातल्या सीतेला रावणाच्या तावडीतून सोडण्यासाठी आपला राम आपल्या सोबत असला पाहिजे म्हणून कधीही आपल्या श्रद्धेच्या रामाला स्वप्नातही दूर करू नका. असे बहुमोल मार्गदर्शनपर प्रवचन प्रवीण ऋषीजी महाराज यांनी केले.
दरम्यान याप्रसंगी प्रवीण ऋषीजी महाराज यांनी मुमुक्षु प्रतिक्षा भंडारी हिला आशीर्वाद देखील दिले आहेत.