संगमनेर येथे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचा सत्कार
◻️ महाविकास आघाडीच्या नेत्यांप्रती कृतज्ञता - खासदार वाजे
◻️ डॉ. सुधीर तांबे यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट
संगमनेर LIVE | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवार असलेले व मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांनी संगमनेरला सदिच्छा भेट दिली असून विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ. सुधीर तांबे यांसह महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल असा ठाम विश्वास व्यक्त केला.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या निवासस्थानी खासदार वाजे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या सत्कार करण्यात आला याप्रसंगी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. राजाभाऊ वाजे म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, देशाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत यांचासह महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी विश्वास दाखवला. आपण कायम पुरोगामी विचारांचा वारसा जपला असून सर्वांना सोबत घेऊन काम केले आहे. नाशिककडे देशाचे लक्ष होते. मात्र एकतर्फी विजय मिळवण्यामध्ये जनतेचा मोठा सहभाग राहिला आहे. देशाचे संविधान आणि देशाची एकात्मता वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या ३१ उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहेत.
येत्या काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रात सह महाराष्ट्रातून पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या जास्त जागा निवडून येणार असून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार बनेल असा विश्वास व्यक्त करताना काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रति खासदार वाजे यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ. तांबे म्हणाले की, ही लढाई देशाची संविधान वाचवण्यासाठी होती. राजाभाऊ वाजे यांनी सर्वांना सोबत घेऊन मोठे मताधिक्य मिळवले आहे. उत्तर महाराष्ट्रातून आठ पैकी सहा जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले असून महाराष्ट्र हा कायम पुरोगामी विचारांचा राहिला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.