आश्वी येथील ऐतिहासिक वडाचे झाड पुन्हा एकदा बहरले!
◻️ १६० वर्ष जुन्या जीर्ण वडाच्या झाडाला तरुणानी दिले होते जीवदान
संगमनेर LIVE (आश्वी) | हिंदू धर्म व परंपरा यात वडाच्या झाडाला देव वृक्ष मानले जाते. या झाडात ब्रम्हा, विष्णू आणि शिव यांचा वास असतो अशी धार्मिक मान्यता आहे. असाचं एक भव्य आणि १६० वर्ष जुना असा वटवृक्ष आश्वी खुर्द (ता. संगमनेर) येथे दिमाखात उभा आहे.
ऐतिहासिक पेशवेकालीन गणेश मंदीरासमोरील १६० वर्ष जुना असा हा वटवृक्ष मागील सहा महिन्यांपूर्वी जीर्ण होऊन मोडकळीस झाला होता. त्यामुळे गावातील काही तरुण एकत्र आले व शास्त्रशुद्ध पद्धतीने त्यांनी वटवृक्षाचा जीर्ण भाग काढून टाकला, यामध्ये मुळ खोडाचा देखील समावेश होता. त्याठिकाणी असलेले अडथळे आणि घाण देखील या तरुणांनी स्वतः श्रम करुन काढली होती. यांचं वटवृक्षाच्या एका पारंबीची मागील सहा महिन्यांपासून पूर्ण गाव देखभाल करत होते.
दरम्यान उद्या असलेल्या वटसावित्री पोर्णिमेच्या पुर्वसंध्येला यांचं वटवृक्षाच्या पारंबीपासून तयार झालेला नवा वटवृक्ष बहरल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे तरुणांनी केलेल्या श्रमाचे चीज झाल्याचे परिसरात बोलले जात आहे.