देशाच्या विकासासाठी ‘वन नेशन वन इलेक्शन’ची गरज - रामदास आठवले
◻️ केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुर केलेल्या ‘वन नेशन वन इलेक्शन’ प्रस्तावाचे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने स्वागत
संगमनेर LIVE (मुंबई) | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्रीमंडळाने एक देश एक निवडणुक (वन नेशन वन इलेक्शन) या प्रस्तावाला आज मंजुरी दिली. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद समितीने सादर केलेल्या एक देश एक निवडणुक (वन नेशन वन इलेक्शन) या अहवालाला आज केंद्रीय मंत्रीमंडळाने स्वीकृत करुन मंजुरी दिली.
केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुर केलेल्या वन नेशन वन इलेक्शन प्रस्तावाचे रिपब्लिकन पक्षाचे वतीने आपण स्वागत करीत आहोत. देशाच्या विकासासाठी वन नेशन वन इलेक्शन अर्थात एक देश एक निवडणुक ची गरज असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.
महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात देशात दर ५ वर्षांनी निवडणुक झाली पाहिजे हे सुचविलेले आहे. भक्कम लोकशाहीसाठी दर ५ वर्षांनी निवडणुक होणे आवश्यक आहे. देशाचा विकास करतांना निवडणुकीवर वारंवार मोठा खर्च केल्याने विकास कामांमध्ये अडथळा येतो. देशाचा जोरदार विकास करण्यासाठी दर ५ वर्षांनी पंचवार्षीक निवडणुक झाली पाहिजे.
यापुर्वी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका दर ५ वर्षांनी होत असत. अलिकडच्या काळात मात्र तसे होत नाही. पण पुन्हा असे विधानसभा आणि लोकसभा निवडणुका दर ५ वर्षांनी एकत्र झाल्या तर निवडणुकांवर होणारा अमाप खर्च वाचला जाईल. त्या वाचलेल्या निधीतून देशाचा विकास अधिक वेगाने होण्यास मदत होईल. त्यासाठी एक देश एक निवडणुक (वन नेशन वन इलेक्शन) ची सुरुवात आपल्या देशात झाली तर ती देशाच्या विकासासाठी चांगली राहील.
देशाच्या विकासासाठी निवडणुकीमध्ये होणारा अमाप खर्च वाचला तर तो खर्च देशाच्या विकासासाठी कारणी लावता येईल. त्यामध्ये देशाचे हित आणि फायदा आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्यावतीने वन नेशन वन इलेक्शन प्रस्तावाचे आम्ही स्वागत करीत आहोत. अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी दिली.