गांधी परिवार आरक्षणविरोधी - चंद्रशेखर बावनकुळे

संगमनेर Live
0
गांधी परिवार आरक्षणविरोधी - चंद्रशेखर बावनकुळे

◻️ राहुल गांधी यांची विधाने मागासवर्गीयांचे हक्क नाकारणारी

◻️ डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राचा विकास करणार

संगमनेर LIVE | जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि आता राहून गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केले. त्यांचे विधान अत्यंत गंभीर असून, त्यांचे पोटातील ओठावर आले. राहुल गांधी जेव्हा महाराष्ट्रात येतील तेव्हा त्यांना ओबीसी, एसटी समाजातील सर्व एकत्रितपणे आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा असे खडसावून विचारू, असे स्पष्ट मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

बावनकुळे म्हणाले, ”राहूल गांधी जेव्हा जेव्हा परदेशात जातात तेव्हा तेव्हा ते भारत विरोधी वक्तव्य करतात. त्यांना काही दिवस त्यांना परदेशात जाण्यावर बंदी घालावी.”

बावनकुळे यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील शंभर दिवसातील लेखाजोखा मांडला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या जाहीरनाम्यामधील बहुतांश कामे मागील १०० दिवसांत मोदी सरकारने पूर्ण केली आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या कामांना जनतेसमोर घेऊन जात आहोत. महाराष्ट्राचा विकास डबल इंजिन सरकारच करेल हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, विमानतळे, मेट्रो, रेल्वे प्रकल्पाला मंजुरी, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा १७ वा हप्ता, २०२४-२५ वर्षांसाठी शेतमालाचा हमीभावात वाढ, शेतकऱ्यांसाठी १४ हजार २०० कोटींच्या सात मोठ्या योजनांना दिलेली मान्यता सरकारचे हे काम लक्षणीय  आहे.

मध्यमवर्ग व तरुणांना दिलासा..

मध्यमवर्गाला मोठा दिलासा देत ७ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कर माफ केला आहे. युनिफाईड पेंशन योजना सुरू केली. शहरी योजनेंतर्गत १ कोटी तर ग्रामीण भागात २ कोटी घरांना मंजुरी प्रदान केली आहे. स्टार्टअप आर्थिक सवलत देण्यासाठी आणि नवोक्रमासाठी प्रोत्साहनासाठी योजना आखल्या आहेत. तरुणांसाठी २ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. यामुळे तरुणांच्या रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना मिळेल.

सशक्त नारी शक्ती..

देशातील नारीशक्तिला सक्षम करण्यासाठी दीनदयाल अंत्योदय योजनेअंतर्गत १० कोटी महिलांना एकत्र आणून ९० लाखाहून अधिक बचत गट तयार करण्यात येत आहेत. लखपती दिदी योजनेतून ११ कोटी महिलांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्रात महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. महिलांसाठी २५०० कोटींचा सामुदायिक गुंतवणूक निधी जारी केला असून त्यातून २८ लाख महिला बचत गट सदस्यांना लाभ होईल.

सामाजिक सक्षमीकरण..

ओबीसी, दलित, अल्पसंख्यांक आणि आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानातंर्गत ६३ हजार गावांचा विकास केला जाणार आहे. यातून ५ कोटी आदिवासींच्या आथिक स्थितीमध्ये सुधारणा होणार आहे. आयुष्यमान भारत योजनेचा विस्तार करण्यात आला असून ७० वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना ५ लाखांपर्यंत मोफत वीमा योजनेचा लाभ मिळणार आहे. याशिवाय विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्र, प्रशासन व कायदा व सुव्यवस्था, उर्जा सुरक्षा परराष्ट्र धोरण, आपत्ती व्यवस्थापन तसेच सुरक्षा यावर मोदी सरकारने चमकदार कामगिरी केली आहे.

पत्रपरिषदेला नागपूर महानगर जिल्हाध्यक्ष बंटी कुकडे, नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, प्रदेश उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, माजी आमदार सुधीर पारवे, माजी आमदार डॉ. मिलिंद माने यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आदिवासी भागातील लोकांच्या मनात जी नकारात्मक विरोधकांनी भरली ती काढून विकास करण्याचे काम करणार असून संजय गायकवाड किंवा अनिल बोन्डे यांच्या वक्तव्याचा समर्थन करत नाही पण राहुल गांधी यांनी देखील सांभाळून बोलावे. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे याना मुख्यमंत्री करण्याची भूमिका तयार केली आहे. नाना पटोले यांनी मुख्यमंत्री बनण्याआधी आरक्षणाबाबतची भूमिका जाहीर करावी. महाराष्ट्रात चुकीने कॉंग्रेसचे सरकार आल्यास केंद्र सरकारच्या योजना बंद केल्या जातील. असेही बावनकुळे म्हणाले आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !