सहकार महर्षी थोरात कारखान्याकडून ऊसाला ३ हजार १५ रुपये भाव जाहीर
◻️ सहकाराबरोबर आपली चांगली संस्कृती जपा - बाळासाहेब थोरात
◻️ थोरात कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ संपन्न
संगमनेर LIVE | सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर संगमनेरच्या सर्व सहकारी संस्था काम करत असून या संस्थांमुळे तालुक्यातील नागरिकांच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण झाली आहे. एकरी जास्तीत जास्त उत्पादन वाढवताना कार्यक्षेत्रात १० लाख टना पेक्षा जास्त ऊस निर्माण झाला पाहिजे. चांगला सहकार व चांगली संस्कृती आपल्या सर्वांना जपायची असून मागील हंगामातील कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना प्रति टन ३०१५ रुपये प्रमाणे भाव कारखान्याने जाहीर केला असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभात ते बोलत होते.
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, सहकारी संस्थांमुळे संगमनेरची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. येथील अर्थव्यवस्था, समाज जीवन आणि प्रत्येक माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये याचा नक्की प्रभाव दिसत आहे. कारखान्याने कायम चांगला भाव दिला असून यामुळे शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार, व्यापारी या सर्वांमध्ये आनंद आहे
कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १० लाख मे. टन पेक्षा जास्त ऊस उत्पादन होणे गरजेचे आहे. कमी क्षेत्र आणि कमी पाण्यामध्ये एकरी जास्तीत जास्त उत्पादन झाले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. थोरात कारखान्यावर शेतकरी, सभासद, आणि कार्यक्षेत्राबाहेरी ऊस उत्पादकांचाही मोठा विश्वास असून हा विश्वास हेच कारखान्याचे भांडवल आहे.
निळवंडेच्या पाण्यामुळे दुष्काळी भागामध्ये शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले आहे. ऊस उत्पादन वाढीसाठी याचा नक्कीच लाभ होणार आहे. दूध संघाने सातत्याने चांगला भाव दिला असून प्रति लिटर एक रुपयाप्रमाणे रिबिट जाहीर करून नुकतेच ३८ कोटी रुपये बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे. कारखान्याने ही यापूर्वी २८०० रुपये प्रति टन भाव दिला आहे. दिवाळीनिमित्त २१५ रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असून ३०१५ पंधरा रुपये असा भाव कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. हीच समृद्ध परंपरा आपल्याला कायम जपायचे असून एकरी जास्तीत जास्त उत्पादन करा असे आव्हान त्यांनी केले.
कामगारांना २० टक्के बोनस व ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान..
थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम ऊस उत्पादक, सभासद यांचे हित जोपासण्याबरोबर कामगारांच्या जीवनातही आनंद निर्माण केला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी दिवाळीनिमित्त कारखान्याच्या सर्व कामगारांना २० टक्के बोनस व ३० दिवसांचे सानुग्रह अनुदान दिले जाणार असल्याने कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी मोठा आनंद व्यक्त केला आहे.