संगमनेर तालुक्‍यातील दडपशाही व गुंडगिरीची संस्कृती उघडून फेका - डॉ. सुजय विखे

संगमनेर Live
0
संगमनेर तालुक्‍यातील दडपशाही व गुंडगिरीची संस्कृती उघडून फेका - डॉ. सुजय विखे

◻️ हिवरगाव पावसा येथे आयोजित युवा संकल्‍प मेळाव्याला विराट गर्दी

◻️ माजी महसूल मंत्र्यांनी गायरान जमिनी स्‍वतच्‍या संस्‍थांच्‍या नावावर करुन घेतल्या

◻️ युवा संवाद यात्रा काढणाऱ्यासोबत युवा आहेत का?

संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्‍याची संस्‍कृती ही फक्त दडपशाही आणि गुंडगिरीमध्‍ये अडकलेली आहे. येथील विकास हा फक्‍त ठराविक कुटूंबासाठी आणि ठेकेदार पोसण्‍यासाठी सुरु आहे. युवा संवाद यात्रा काढता पण तुमच्‍या सोबत युवा राहीला आहे का? असा थेट सवाल डॉ. सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला.

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे आयोजित केलेल्‍या युवा संकल्‍प मेळाव्‍यात बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुन्‍हा एकदा आ. बाळासाहेब थोरात यांच्‍या कार्यपध्‍दतीवर निशाणा साधला. या तालुक्‍यात सभा घेतांना रोज नवीन काहीतरी बोलावे लागते. मात्र येथील जनता ४० वर्षे एकच भाषण कसे ऐकते अशी उपरोधीक टिका करुन, तालुका कुटूंब असल्‍याची खोटी सहानुभूती मिळविण्‍याचे प्रयत्‍न वर्षानुवर्षे सुरु असल्‍याचा थेट आरोप त्‍यांनी केला.

तालुक्‍यातील आमदारांनी जी गावे दत्तक घेतली त्‍या गावांना एक रुपयांचा निधी त्‍यांनी कधी दिला नाही. याच गावाने मात्र विखे पाटील यांना मानणारे सरपंच निवडून येतात याकडे लक्ष वेधून आता त्‍यांच्‍याकडे दत्‍तक जावू नका कारण त्‍यांच्‍या कुटूंबात जागा नाही, त्‍यांच्‍या  कुटूंबात फक्‍त ठेकेदारांना संधी आहे. आता विखे पाटील परिवार तुमच्‍यासाठी समर्थ आहे. आमच्‍या गाडीत ठेकेदारांना नव्‍हे तर कार्यकर्त्‍यांना संधी आहे. अंगणवाडीच्‍या कामात सुध्‍दा पैसे खाणारे ठेकेदार यांनी निर्माण केले, हीच का तुमची संस्‍कती याचे उत्‍तर आता जनता मागत आहे.

या तालुक्‍यात फक्‍त संस्‍कृतीवर भाषणं सुरु होतात मात्र आमची संस्‍कृती जमीनी हडपण्‍याची नाही. माजी महसूल मंत्र्यांनी गायरान जमीनी स्‍वतच्‍या संस्‍थांच्‍या नावावर करुन घेतल्‍या. मात्र महसूल मंत्री ना. विखे पाटील यांनी साडे तीनशे कोटी रुपयांच्‍या जमीनी या अनेक गावांच्‍या विकासासाठी आणि औद्योगिक वसाहत उभारण्‍यासाठी दिल्‍या. याकडे लक्ष वेधून एकदा संस्‍कृतीवर चर्चा कराच, तुमची संस्‍कृती फक्‍त ठेकेदार जीवंत ठेवण्‍यासाठी असल्‍याची टिका डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली.

निळवंडे होवू देत नाही असे अनेक आरोप विखे पाटील परिवारावर झाले. स्‍व. बाळासाहेब विखे पाटील यांना बदनाम केले गेले. परंतू भगवान के घर देर है अंधेरा नही. निळवंड्यांचे पाणी मंत्री ना. विखे पाटील यांनीच आणून दाखविले. यासाठी जेष्‍ठ नेते पिचड साहेब यांचेही मोठे सहकार्य मिळाले, त्‍यांचे योगदान कोणीही नाकारु शकत नाही. कधीतरी खर बोलायला शिका, केवळ प्‍लेक्‍स लावून स्‍वत:चा उदोउदो करुन घेणारी ही माणसं शेतकऱ्याला पाणी देवू शकत नाही. आमच्‍या तालुक्‍यात या आम्‍ही स्‍वत:च्‍या खिशातून पैसे घालून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविले.

तालुक्‍यात परिवर्तन करण्याची हीच संधी आहे. महायुती सरकारने अनेक योजना दिल्‍या आहेत, त्‍याचा लाभ सर्वांनाच मिळाला आहे. महायुतीच्‍या योजनांमध्‍ये गरीब, श्रीमंत असा भेद नाही. अंमलबजावणीमध्‍ये  पक्षीय राजकारण नाही. राजहंस दुध संघाला सुध्‍दा दूध अनुदानापोटी १४ कोटी रुपये दिले याकडे लक्ष वेधून येणाऱ्या काळात यांच्‍या दडपशाहीची संस्‍कृती उखडून टाकण्‍याचे काम तुम्‍हाला करायचे आहे. निर्धार करा या तालुक्‍याचा यंदाचा आमदार हा महायुतीचाच करायचा आहे. मुख्‍यमंत्री पदाची स्‍वप्‍न पाहणारे आता आमदारही होवू शकणार नाही याचा पुर्नउच्‍चारही डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुन्‍हा केला.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !