महाविकास आघाडीचा धर्म न पाळणारे पदाधिकारी पदावर कायम कसे?
◻️ माजी शहराध्यक्ष अमर कतारी यांचा सवाल
◻️ ठाकरेंच्या शिवसेनेकडून कॉग्रेसच्या बाळासाहेब थोराताचा झंझावाती प्रचार
संगमनेर LIVE | राज्यात शिवसेना(उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि कॉग्रेस या पक्षांनी महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करुन दाखवला. त्यानंतर घडलेल्या राजकीय नाट्यानंतर होणारी ही पहिली विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हा सत्ता संघर्ष निवडणुकीच्या माध्यमातून होणार असल्याने निवडणुकीनंतर राज्यावर कोणाची सत्ता येईल हे स्पष्ट होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला भाजप महायुतीला रोखण्यात यश आले होते. त्यासाठी ठाकरे आणि पवारांच्या साथीला आमदार बाळासाहेब थोरात यांनीही सिंहाचा वाटा उचलला होता. मात्र नगर जिल्ह्यात आणि विशेषत: संगमनेर तालुक्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पदाधिकारी निष्क्रिय आहेत. अश्या लोकांना पक्षासाठी काम करायची ईच्छा नसेल तर वरिष्ठांचे अभय कशासाठी? असा प्रश्न अमर कतारी यांनी उपस्थित केला आहे.
निष्ठावंत म्हणवले जाणारे प्रचारापासून दूर असतानाच आता माजी शहर प्रमुख अमर कतारींच्या नेतृत्वाखाली ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीच्या थोरातांच्या प्रचारासाठी मैदानात! शहरात पदयात्रेच्या माध्यमातून प्रचार मोहीम राबवत आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघातून नवव्यांदा निवडणूक लढविणारे महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात राज्यभर उमेदवारांची प्रचार मोहीम राबवत असताना संगमनेरात मात्र कार्यकर्त्यांनी प्रचार मोहीम हाती घेतली आहे. उद्धव बाळासाहेब शिवसेनेचे निष्ठावंत म्हणविले जाणारे अनेक जण प्रचार मोहिमेपासून दूर असताना माजी शिवसेना शहर प्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली मात्र शिवसेनेतील एक गट प्रचारात सक्रिय झाला आहे. बाळासाहेब थोरात यांच्यासाठी प्रचार करत ते शहराच्या विविध भागात पदयात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत आहे.
बाळासाहेब थोरात यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून नवव्यांदा त्यांना पुन्हा लोकप्रतिनिधी म्हणून पाठविण्यासाठी मतदार सज्ज असल्याचा दावा करण्यात येत आहे. शहराच्या विविध भागातून कतारी यांनी काढलेल्या या प्रचार फेऱ्या देखील मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरल्या आहे. महाविकास आघाडीचा धर्म या फेऱ्यांमधून पाळला जात असल्याचा संदेश मतदारांमध्ये पोहोचविण्यात कतारी यशस्वी झाले आहे. तसेच निष्ठावंत म्हणविल्या जाणाऱ्या, अपेक्षा ठेवून असलेल्या आणि महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारापासून अद्यापही दूर असलेल्यांसाठी ही चपराक मानली जात आहे.
सुरुवातीला या मतदारसंघात टायगरच्या डरकाळ्यांनी मोठी चुरस निर्माण केली होती. मात्र चुरस निर्माण करणारा टायगर या मतदारसंघातील सिंहाशी लढेल याची सुतराम शक्यता वाटत नव्हती. अखेरीस तसेच घडले आणि थोरात यांच्या विरोधात भाजपकडून आयात केलेला उमेदवार शिवसेनेच्या तिकिटावर लादण्यात आला. याचवेळी थोरात यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी झाली असताना देखील थोरात समर्थक आणि महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक थोरात यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी गांभीर्याने घेतली असल्याचे कतारी यांनी म्हटले आहे.
संगमनेर शहर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी संगमनेर शहरात सकाळी आणि संध्याकाळी विविध भागात शिवसैनिकांना तसेच मोठ्या प्रमाणात महिलांना सोबत घेत पदयात्रेच्या माध्यमातून शहरातील प्रभाग निहाय प्रचार दौरा सुरू केला आहे.
आतापर्यंत उध्दव ठाकरेचा प्रचार करणारे आता आघाडीचा धर्म पाळत ते थेट कॉग्रेसचा प्रचार करू लागले आहे. आघाडीची भूमिका ते मतदारांना पटवून देत आहे. त्यांच्या प्रचार फेऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. रस्त्यावर, व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये, विविध गल्लीबोळात, घरोघर त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक या प्रचार फेऱ्यांमध्ये सहभागी झाले आहे.
यावेळी माजी शहर प्रमुख अमर कतारी यांच्या नेतृत्वाखाली युवासेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद, युवा जिल्हा प्रमुख अमित चव्हाण, वाहतुक सेना शहरप्रमुख इम्तियाज शेख, युवासेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे, युवासेना शहरप्रमुख गोविंद नागरे, माजी तालुका प्रमुख राजू सातपुते, ज्येष्ठ शिवसैनिक कयूम शेख, आसिफ तांबोळी, प्रथमेश बेल्हेकर, गणेश धात्रक, गुलाब कोकाटे, रंगनाथ फटांगरे, योगेश खेमनर, एकनाथ खेमनर, लखन सोन्नर, सागर भागवत, पप्पू कानकाटे, जना नागरे, प्रकाश गायकवाड, संगमनेर नगरपरिषद पथविक्रेता समिती सदस्य दीपक साळुंके,
विभाग प्रमुख परवेज शेख, इमरान सैय्यद, प्रशांत खजुरे, प्रकाश चोथवे, सचिन साळवे, मच्छिंद्र फुलमाळी, हर्ष कतारी, तसेच महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख आशा केदारी, शहर प्रमुख संगीता गायकवाड, महिला तालुका प्रमुख शीतल हासे, उपतालुकाप्रमुख रेणुका शिंदे, जयश्री वाकचौरे, रिक्षा सेनेचे अशोक बडे, उपतालुकाप्रमुख बाळासाहेब कवडे, शरद कवडे, निलेश गुंजाळ, संकेत खुळे, सचिन पावबाकी, सदाशिव हासे, व्यापारी आघाडीचे संभव लोढा, अनिल खुळे, जयदेव यादव, प्रथमेश बेल्हेकर, अक्षय गाडे, पदाधिकारी, कार्यकर्त्या, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, शिवसैनिक सहभागी झाले होते.