संगमनेर तालुका दहशतमुक्त करा ; विखे पाटील यांचे मतदारांना आवाहन
◻️ महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या प्रचारासाठी सावरगावतळ आणि पेमगिरी येथे सभा
◻️ युवकांना रोजगार आणि गावांना पाणी देवू न शकणाऱ्यांना निवडणूकीत धडा शिकवा
◻️ नांदुरी दुमालाच्या माजी सरपंचाचा समर्थकासह शिवसेनेत प्रवेश
संगमनेर LIVE | कोव्हीड संकटाच्या काळात जे तुमचे झाले नाहीत ते आता तरी तुम्हाला जवळ कसे करतील? ४० वर्षात त्यांनी या तालुक्याला फक्त धाक व दडपशाही दिली. विकासाच्या नावाखाली फक्त स्वत:ला मिरवून घेतले. युवकांना रोजगार आणि गावांना पाणी देवू न शकणाऱ्यांना या निवडणूकीत धडा शिकवा. हा तालुका दहशतमुक्त करण्याचा निर्धार करा असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
संगमनेर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अमोल खताळयांच्या निवडणूक प्रचारार्थ सावरगावतळ आणि पेमगिरी या ठिकाणी आयोजित केलेल्या प्रचार सभेत मंत्री विखे बोलत होते.
महायुतीचे उमेदवार अमोल खताळ, भाजप ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राहणे, रमेश काळे, वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉ, अशोक इथापे, भाजपचे उपाध्यक्ष अशोक कानवडे, माजी पंचायत समिती सदस्य सुनिता कानवडे, शौकत जाहगीरदार, अण्णासाहेब गोडसे डॉ. सोमनाथ कानवडे तसेच सावरगावतळ येथील सभेला भाजप माजी तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे, भाजप उपाध्यक्ष बाळासाहेब शेटे, परसराम नेहे, शरद नेहे, रावसाहेब थिटमे आदी उपस्थित होते.
विखे पाटील पुढे म्हणाले की, संगमनेर तालुक्यातील सत्ताधाऱ्यांच्या निवडणूका अडचणीत आल्या की, त्यांची धाक - दडपशाही सुरु होते. यापुर्वीही झालेल्या कारखाना आणि विधानसभेच्या निवडणूकीत यांनी दहशतीनेच विजय मिळविले आहेत. यंदा तर जनता थारा द्यायला ही त्यांना तयार नाही. त्यामुळेच आता नातेवाईक, मित्र व सर्वसामान्य माणसांची आठवण झाली आहे. प्रत्येकाच्या घरी जावून दबाव आणण्याचे काम सुरु आहे. पण आता आपला स्वाभिमान जागृत करुन, या तालुक्यात परिवर्तन घडवा असे आवाहन केले.
चाळीस वर्षांच्या वाटचालीत आजपर्यंत फक्त दिशाभूल करण्याचे काम झाले, खोटी आश्वासनं दिली गेली. औद्योगिक वसाहतीत तीस हजार युवकांना रोजगार दिल्याचा दावा करतात, हा कोणाला तरी पटण्यासारखा आहे का असा प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित करुन, जिथे उद्योगच आणले नाहीत तिथे रोजगारच तरी कसा उपलब्ध होणार असा टोला लगावला. यांच्या सहकारी संस्था सोडल्या तर, रोजगाराची कुठलीही साधनं निर्माण करु शकले नाही. हेच यांचे मोठे अपयश असल्याची टिका विखे पाटील यांनी केली.
ही निवडणूक कारखान्याची नाही, विधानसभेचे आहे. केलेल्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला पाहीजे. पण यांचा लेखाजोखा दहशतीच्या पुढे जायला तयारच नाही. शिर्डीत येवून दहशतीची भाषा करतात, अरे कधी तरी विकासाचे काय करणार हे सांगा. स्वत:च्या तालुक्या तही हे केलेला विकासही सांगू शकत नाही, हेच यांचे मोठे अपयश असल्याचे सांगताना महायुती सरकारने न मागता योजना जाहीर केल्या.
लाडक्या बहीणींसाठी योजना सुरु केली. तर, हेच कॉंग्रेसचे नेते कोर्टात गेले. आता राहुल गांधी येवून तीन हजार रुपये देतो असे सांगतात. मग अडीच वर्ष काय झोपले होते का? एक रुपयात पीक विमा योजना सुरु करुन, तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात २५ कोटी रुपये जमा केले. दूधाचे अनुदान दिले, वीज बिल माफ केले. आता नव्याने सरकार येवू द्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी सुध्दा महायुती सरकार करुन दाखवेल याची ग्वाही देखील ना. विखे पाटील यांनी दिली.
पेमगिरी सारख्या ठिकाणी चांगले पर्यटनस्थळ निर्माण होवू शकते. या माध्यमातून या भागात रोजगाराच्या संधी आहेत, महायुती सरकारच्यामाध्यमातून यासाठी निधी देण्याचे आश्वासित करुन, मंत्री विखे पाटील म्हणाले की, या तालुक्यातील समृध्दीला सहकारी साखर कारखाना कारणीभूत ठरला. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे, दत्ता देशमुख, माजी मंत्री बी. जे खताळ पाटील यांच्या योगदानातून हे सर्व उभे राहीले. पण त्याची जाणीव ही त्यांनी ठेवली नाही. अशी घणाघाती टिका ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
नांदुरी दुमालाच्या माजी सरपंचाचा समर्थकासह शिवसेनेत प्रवेश..
तालुक्यातील नांदुरी दुमाला गावच्या माजी सरपंच अर्चना शेळके, भाऊसाहेब नेहे, माजी उपसरपंच अँड. मिनानाथ शेळके, सोनबा पथवे, ग्रामपंचायत सदस्य निखिल निळे, नामदेव कोकणे, वंदना कोकणे, डॉ. सोपान कवडे, नांदुरी सोसायटी संचालक चंद्रभान शेळके, अशोक मेंगाळ, विलास शेटे आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांना निवडून आणण्याची ग्वाही देण्यात आली.