स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्यांनी राहुल गांधींना नावे ठेवू नये - बाळासाहेब थोरात
◻️ महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे प्रचारासाठी उंबरी बाळापूर येथे सभा
◻️ वाळू धोरण आणि दुध अनुदानावरुन विद्यमान मंत्र्यावर माजी मंत्र्यांचे खरमरीत टिकास्त्र
◻️ राहाता मतदार संघात आता क्रांतीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाल्याचा व्यक्त केला विश्वास
संगमनेर LIVE (आश्वी) | राहाता मतदार संघ हा येथील प्रस्थापित नेत्यांच्या गुंडशाही व दडपशाहीला कंटाळलेला असून त्याचा बीमोड करण्याचे आता जनतेने ठरवले आहे. दुसऱ्याला दोष द्यायचा व स्वतः मात्र मनमानी कारभार करायचा ही त्यांची वृत्ती आहे. राहाता मतदार संघात आता क्रांतीच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली असून स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्यांनी राहुल गांधींना नावे ठेवू नये. अशी खरमरीत टिका कॉग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे जेष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता केली.
संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत बाळासाहेब थोरात बोलत होते. खा. भाऊसाहेब वाकचौरे, तेलंगणाच्या मंत्री सिताअक्का यांच्यासह पंचक्रोशीतून आलेले मान्यवर, पदाधिकारी आणि नागरीक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, राहाता तालुक्यात प्रस्थापितांची प्रचंड दहशत असून येथे कोणालाही विरोधी बोलण्याची संधी नाही. पैशाच्या व सत्तेच्या जोरावर चाललेली यांची दहशत फार काळाची राहिली नाही. यावेळी जनतेने परिवर्तनाचा ध्यास घेतला आहे. प्रभावती घोगरे यांच्या रूपाने महाविकास आघाडी व राहाता मतदार संघाला योग्य उमेदवार मिळाला आहे.
विखे पाटील यांच्यावर टिका करताना ते म्हणाले की, विद्यमान महसूल मंत्र्यांचे वाळू धोरण हे पूर्णतः फसले असून त्याचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. वाळू माफिया निर्माण व्हावे व यांच्या तिजोऱ्या भराव्या यासाठी यांनी हे धोरण राबवले. विधानसभेत प्रश्न विचारला असता त्यांना याबाबत ठोस उत्तर देता आले नाही. यांनी स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलला. स्वार्थासाठी व सत्तेसाठी कोलांट्या उड्या मारणाऱ्यांनी राहुल गांधींना नावे ठेवू नये. यांना सत्तेची भूक असून सत्तेतून पैसा व पैशातून दहशत निर्माण करण्याची यांची पूर्वीपासून पद्धत असलचे म्हटले.
त्याना पराभवाच्या भीतीने घाम फुटला असून दुग्धविकास मंत्री असताना दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचे यांनी जाहीर केले मात्र, अद्यापही अनुदान दिले नाही. यांच्या मतदार संघातील सर्वच संस्था मोडकळीस आल्या आहे. नगर, शिर्डी, कोपरगाव या रस्त्याचे काम यांना करता आले नाही. गणेश कारखाना यांच्या दहशतीला पूर्णपणे कंटाळला होता. म्हणूनच आपल्या हातात त्यांनी कारभार दिला.
संगमनेर तालुक्यासारखी अर्थव्यवस्था, समृद्धी व राजकारण आणायचे असेल तर आता या मतदारसंघातही दुरुस्ती करणे गरजेचे आहे. महाविकास आघाडीत मंत्रीपद असताना या मतदारसंघात कामांना मंजुरी व निधी दिला. पण, त्याचा कधी गवगवा केला नाही. हे मात्र कोतवाला पर्यत फोन करतात हे हास्यास्पद आहे. यांना बहीण लाडकी नसून सत्ता लाडकी आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर त्यांनी पराभवाच्या भीतीने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. पराभवाच्या भीतीने आता त्यांनी माझ्यासह प्रभावती घोगरे यांच्या भाषणवर बंदी आणण्याचे प्रयत्न सुरू केले असल्याचा गंभीर आरोप केला.
दरम्यान याआधी खा. भाऊसाहेब वाकचौरे, उमेदवार प्रभावती घोगरे यांनी देखील मनोगत व्यक्त केले.