हसून जिरवणाऱ्याचा राजकीय दशहतवाद जनता उखडून टाकील - विखे पाटील

संगमनेर Live
0
हसून जिरवणाऱ्याचा राजकीय दशहतवाद जनता उखडून टाकील - विखे पाटील 

◻️आश्‍वी येथील सभेमध्‍ये मंत्री विखे पाटील यांचे आ. थोरात यांच्‍या कार्यपध्‍दतीवर टिकास्‍त्र

◻️ त्यांची निष्‍ठां सिल्‍व्हर ओक, मातोश्री आणि रात्री भाजप चरणी अर्पण 

◻️ निळवंडे पुर्नवसनासाठी दिलेल्या जमीनी तुमच्या जावयाच्‍या नावावर कशा? मंत्री विखे पाटील यांनी सभेत ७/१२ उताराचं दाखवला

संगमनेर LIVE (आश्‍वी) | नाशिक पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्‍या निवडणूकीत जे महाविकास आघाडीशी प्रामाणिक राहीले नाहीत, त्‍यांनी आम्‍हाला पक्ष निष्‍ठेच्‍या गोष्‍टी शिकवू नयेत. ज्‍यांनी स्‍वत:च्‍या निष्‍ठाच भाजप, सिल्‍व्हर ओक आणि मातोश्रीच्‍या चरणी अर्पण केल्‍या आहेत त्‍यांना तालुक्‍यातील जनतेप्रती निष्‍ठा  राहीलेल्‍या नाहीत. ज्‍यांनी सहकारी संस्‍था काढून दिल्‍या  त्‍यांची आठवणही न ठेवणारे जनतेला कधी विसरतील हे सांगता येत नाही. कोणताही विकास न करता हसून जिरविण्‍याचे काम करणाऱ्यांचा राजकीय दशहतवाद जनता उखडून टाकल्‍याशिवाय राहणार नाही असा इशारा महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिला.

संगमनेर तालुक्यातील आश्‍वी येथे आयोजित केलेल्‍या महायुतीच्‍या सभेमध्‍ये मंत्री विखे पाटील यांनी आ. थोरात यांच्‍या निष्‍क्रीय कार्यपध्‍दतीवर पुन्‍हा एकदा टिकास्‍त्र  सोडले. आमचे सरकारचे वाळू धोरण फसले म्‍हणणाऱ्यांचे माफीया फसले आहेत, आमचे वाळू धोरण चांगलेच आहे. या धोरणामुळे तुमची अडचण झाली आहे. हीच परि‍स्थिती त्‍यांच्‍या दूध संघाचीही झाली आहे. यांचा दूधसंघ येवढा चांगला आहे तर, सरकारला अनुदान देण्‍याची वेळ का आली? महायुती सरकारचे सुमारे १० कोटी रुपयांचे अनुदान आम्‍ही राजहंस दूध संघाला दिले. यामध्‍ये आम्‍ही राजकीय अभिनिवेश ठेवला नाही. आम्‍हाला दूध धंदा कळत नाही असे म्‍हणणाऱ्यांनी एकदा महानंदामध्‍ये आपल्‍या जावयाने काय केले हे एकदा तपासून पाहा, तुमच्‍या अमृतवाहीनी बॅकेची आवस्‍था कशी नाजुक झाली आहे हे आता सांगायला लावू नका असे सुचक वक्‍तव्‍यही त्‍यांनी आपल्‍या भाषणात केले.

पद्मश्री विखे पाटील यांनी संगमनेर कारखाना उभारुन दिला. पहिल्‍या संचालक मंडळात तर भाऊसाहेब थोरात सुध्‍दा नव्‍हते. पण ज्‍यांनी कारखाना उभारणीत योगदान दिले त्‍यांची आठवणही यांनी ठेवली नाही. आज पद्मश्रींनी दाखविलेल्‍या मोठ्या मनामुळे तुम्‍हाला समृध्‍दी प्राप्‍त झाली आहे. सह्याद्री शिक्षण संस्‍थाही काढणाऱ्यांचा विसर आ. थोरातांना पडला हाच त्‍यांचा राजकीय दहशतवाद असल्‍याचा आरोप करुन, मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, सुसंस्‍कृत तालुका म्‍हणून मिरवून घेता आणि साईबाबांच्‍या दरबारात येवून धांदात खोट बोलता. असा घणाघात त्यांनी केला.

३० हजार युवकांना रोजगार दिल्‍याचा दावा तुम्‍हाला तरी खरा वाटतो का? असा प्रश्‍न उपस्थित करुन, पक्ष निष्‍ठेच्‍या गोष्‍टी करणाऱ्या थोरातांनी नाशिक पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीशी कशी गद्दारी केली याची आठवण करुन देत, यांच्‍या निष्‍ठा आता दुपारी सिल्‍व्‍हर ओक आणि भाजप नेत्‍यांशी आहे. रात्री तुम्‍ही कोणकोणत्‍या भाजप नेत्‍यांना भेटता हे आता मला बोलायला लावू नका असेही ना. विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले.

निळवंडे धरणाच्‍या बाबतीत तीस वर्ष लोकांची फसवणूक केली. अनेक वर्ष मंत्री राहीलात, पण पहिल्‍या २० कि. मी अंतरावरील काम तुम्‍हाला सुरु करता आले नाही. शरद पवार यांनी सुध्‍दा येवून चार चार वेळा भूमीपुजन केले. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या पुढाकारामुळे कालव्‍यांची कामे झाली आणि पाणी आले हे पुण्‍य आम्‍ही करतो. जे ३५ वर्षात झाले नाही ते आम्‍ही दोन वर्षात करुन दाखविले. उर्वरित कामासाठी केंद्राकडून ८०० कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन घेतला असल्‍याने ना. विखे पाटील म्‍हणाले.

अडीच वर्षात एकही विकासचे काम महाविकास आघाडी कडून झाले नाही. तसेच या गावांना २००९ पासून मीच दत्‍तक घेतले. कुठल्‍याही सुविधा या गावांना नव्‍हत्‍या. ही गावे आपल्‍या मतदार संघात जोडल्‍यानंतर भविष्‍यातही या गावातील विकासाला निधी उपलब्‍ध करुन देण्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली.

बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे प्रकल्पग्रस्‍तांच्‍या पुर्नवसनासाठी जमीन दिल्‍याचा वारंवार उल्‍लेख करतात, पण या जमीनी पुन्‍हा जावयाच्‍या नावावर कशा झाल्‍या मंत्री विखे पाटील यांनी सभेतमध्‍ये ७/१२ उतारा दाखवून त्‍यांचा खोटेपणा उघड केला असे सांगून मीही आता महसूल मंत्री आहे हे ते विसरुन गेले आहेत. त्‍यांचे असे अनेक उतारे माझ्याकडे आहेत. असा टोला यावेळी लगावला.

प्रियंका गांधींच्‍या सभेवर आपली प्रतिक्रीया व्‍यक्‍त करताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, त्‍यांच्‍या सभेतून दुसरे तिसरे काही नाही तर बौध्‍दीक दिवाळखोरी समोर आली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !