आश्वी पोलीस स्टेशन हद्दीत ४० हजार रुपये किंमतीचे चारशे किलो गोमांस पकडले
◻️ अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांसह ४ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त
◻️ विधानसभा निवडणुकीसाठी नेमलेल्या भरारी पथकांची कारवाई
संगमनेर LIVE (आश्वी) | गोवंश हत्याबंदी कायदा राज्यात लागू असला तरी मांसाची विक्री वा वाहतूक सहजपणे होत असल्याचे प्रकार वारंवार संगमनेर तालुक्यात पुढे येत असतात. विधानसभा निवडणुकीनिमित्त निमगावजाळी येथे नेमणूकीस असलेल्या भरारी पथकांने शनिवारी रात्री गोवंश मांसाची वाहतूक करणारे वाहणं पकडून कारवाई केली आहे.
याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात महिला पोलीस कॉन्स्टेबल अर्चना बाचकर (नेमणूक लोणी पोलीस ठाणे, ता. राहाता) यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सध्या विधानसभा निवडणुक अनुषंगाने एसएसटी क्रमांक ०३ निमगावजाळी आरके गार्डन येथे उभारण्यात आलेल्या चेक पोस्ट येथे मी नेमणूकीस आहे.
शनिवार दि. १६/११/२०२४ रोजी पोलीस नाईक रविंद्र मेंढे, मॅजिस्ट्रेट इन्चार्ज विजय मारोस्कर, व्हिडिओ ग्राफर दादासाहेब वाडेकर, सीआरपीएफ जवान रामजी मिश्रा, हरीओम निमोद, अनुप मिश्रा, सचिन नागदेव यांच्यासह लोणी ते संगमनेर रस्त्यावरील वाहनांची तपासणी करत होतो. रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास लोणीकडून संगमनेरच्या दिशेने जाणाऱ्या पिकअप गाडी क्रमांक एम. एच. १५. एफ व्ही. ३५९६ हिची तपासणी करत असताना तिच्यामध्ये गोवंश मांस आढळून आले.
त्यामुळे पोलीसांनी गोवंश मांस वाहतूक करणाऱ्या अशपाक शेख व अजीज कुरेशी यांच्याकडे याबाबत अधिक चौकशी केली असता हे मांस श्रीरामपुर येथून नाशिक येथे घेऊन जात असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी पोलिसांनी ४ लाख रुपये किंमतीच्या पाढंऱ्या पिकअपसह ४० हजार रुपये किंमतीचे ४०० किलो गोवंश मांस असा एकून ४ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दरम्यान मपोकॉ अर्चना बाचकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशपाक मुश्ताक शेख (वय -३५) व अजीज इब्राहिम कुरेशी (वय - ३२) दोघे रा. श्रीरामपूर यांच्याविरुद्ध बीएनएस २७१, ३२५, महाराष्ट्र पशु संवर्धन अधिनियम १९७६ चे सुधारीत २०१५ चे कलम ५ (क), ९ प्रमाणे आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.