विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी दुबईवरुन तो आश्वीत दाखल
◻️ लोकशाहीत मतदानाचा हक्क बजावल्याबद्दल व्यक्त केले समाधान
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील प्रतिक संजय गायकवाड हा तरुण विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी थेट दुबईहून आश्वी खुर्द येथे आला होता. सकाळी उत्साहात मतदान केंद्रावर जाऊन मतदान केल्याचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.
आश्वी खुर्द येथील पत्रकार संजय सुभाष गायकवाड यांचा मुलगा प्रतिक हा मागील चार वर्षापासून व्यवसायानिमित्त जगातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या दुबई या देशात वास्तव्यास आहे. मागील वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतात येण्याची त्यांची इच्छा होती. मात्र तांत्रिक कारणास्तव व्हिसा लवकर न मिळाल्याने लोकसभेत मतदानापासून वंचित राहिल्याची सल त्याला भेडसावत होती.
त्यामुळे विधानसभा निवडणुकाची तारीख जाहीर झाल्यानंतर लोकशाहीच्या उत्साहात सहभागी होण्यासाठी सर्व कागदपत्रांची पुर्तता पुर्ण करुन प्रतिक हा १५ दिवस आधीचं भारतातील आपल्या आश्वी खुर्द या मुळगावी दाखल झाला.
दरम्यान मंगळवारी त्यांने शिर्डी विधानसभेसाठी मतदानाचा आपला हक्क बजावल्याचां आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. तरुणानी आपल्या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन प्रतिकने करताना जगातल्या सर्वात श्रीमंत देशात राहत असलो तरी, भारतीय लोकशाहीचा मला अभिमान असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.