आश्वी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात चोरट्यांचा धुमाकूळ
◻️ पिप्रीं फाट्यावरून बोलेरो, चणेगाव येथून मोटरसायकल, तसेच उंबरी बाळापुर येथून पाच तर आश्वी बुद्रुक येथुन दोन शेळ्यांची चोरी
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. यामध्ये पिप्रीं फाट्यावरून एक बोलेरो, चणेगाव येथून एक मोटरसायकल, तसेच उंबरी बाळापुर आणि आश्वी बुद्रुक येथुन शेळ्यांची चोरी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, पिंप्री - लौकी अजमपूर शिवारातील पिंप्री फाटा येथील महेंद्र माधव गिते यांची घराशेजारी लावलेली २ लाख ८० हजार रुपये किंमतीची बोलेरो गाडी (एम. एच. १६ एटी. ०९९२) दिनांक १९ नोव्हेंबर २०२४ रोजी चोरी करुन रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास चोरटे घेऊन चालले होते. मात्र भगवानबाबा कमानी जवळ गाडी उभी करुन चोरटे पळून गेले. त्यामुळे महेंद्र गिते यांनी गुन्हा रंजिस्टर क्रमांक २१३/२०२४ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ६२ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
चणेगाव (ता. संगमनेर) येथील प्रशांत बाळासाहेब लोहाळे यांच्या घरासमोर लावलेली १२ हजार पाचशे रुपये किंमतीची मोटरसायकल (एम. एच. सीक्यु. ४१११) पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास चोरुन नेली. यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरेचे मोठे नुकसान केले. त्यामुळे लोहाळे यांनी गुन्हा रंजिस्टर क्रमांक २१४/२०२४ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३२४(४) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आश्वी बुद्रुक येथील यादव माधव म्हसे यांच्या घराशेजारील गोठ्यातून दिनांक २४ नोव्हेंबर २०२४ रोजी मध्यरात्री १५ हजार रुपये किंमतीच्या दोन काठेवाडी शेळ्या चोरुन नेल्या आहेत. त्यामुळे म्हसे यांनी गुन्हा रंजिस्टर क्रमांक २१९/२०२४ नुसार बीएनएस ३०३ (२) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
उंबरी बाळापुर येथील मंदा आबासाहेब भुसाळ या महिलेच्या घरासमोरील गोठ्यातून दिनांक २४ नोव्हेंबर रोजी २०२४ रोजी मध्यरात्री २० हजार रुपये किंमतीच्या ५ भोर जातीच्या शेळ्या चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे भुसाळ यांनी गुन्हा रंजिस्टर क्रमांक २२०/२०२४ नुसार बीएनएस ३०३ (२) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान मागील अनेक दिवसांपासून आश्वी परिसरातील गावांमध्ये लहान - सहान चोऱ्यांचे सत्र सुरू आहे. विशेष म्हणजे ही गावे आश्वी पोलीस स्टेशनच्या हक्केच्या अंतरावर आहेत. त्यामुळे येथे पोलीस स्टेशन असूनही चोरट्यांवर पोलीसाचा कोणताही धाक येथे राहिलेला नसल्याचे चित्र आहे. तसेच नियमितपणे परिसरातील गावांमध्ये आवश्यक असणारे पोलीसांचे पेट्रोलिंगचे प्रमाण देखील नगण्य झाल्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची भावना जनमानसात निर्माण होऊ लागली आहे.