बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचारा विरोधात काँग्रेस आक्रमक
◻️ संगमनेर काँग्रेस व समाजसेवी संस्थांचे सरकारला निवेदन
◻️ उद्या होणाऱ्या सकल हिंदू समाजाच्या मोर्चात कॉग्रेससह सहकारी संघटना होणार सहभागी
संगमनेर LIVE | हिंदू धर्म हा मानवतेची शिकवण देतो. मात्र राजकीय कारणांसाठी बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून हे अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारने तातडीने राजनैतिक हस्तक्षेप करून बांगलादेश मधील तमाम हिंदू बांधवांना दिलासा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस व विविध समाजसेवी संस्थांनी केली असून हिंदूंवरील अत्याचार तातडीने थांबवा अशी मागणी सौ. दुर्गाताई तांबे यांनी केली आहे. तर उद्या होणाऱ्या सकल हिंदू समाजाला पाठिंबा असल्याचे डॉ. जयश्रीताई थोरात यांनी म्हटले.
संगमनेर तालुका काँग्रेस व विविध समाजसेवी संस्थांच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालय येथे याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी सौ. दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, तालुका काँग्रेस सह विविध समाजसेवी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, बांगलादेशच्या निर्मितीमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे मोठे योगदान असून भारतामुळेच बांगलादेश स्वतंत्र देश म्हणून उदयास आला. मात्र बांगलादेशमध्ये हिंदू धर्मियांवर सध्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून त्यांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होत आहे. मालमत्तेची तोडफोड केली जात आहे. त्यामुळे तेथील हिंदू बांधवांमध्ये अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बांगलादेश मधील अल्पसंख्यांक हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाची भारत सरकारने बांगलादेश सरकारला गंभीर दखल घेण्यास भाग पाडावे. तेथील हिंदू नागरिकांना योग्य ती सुरक्षा द्यावी याच बरोबर इस्कॉनचे प्रमुख चिन्मय कृष्णादास यांची तातडीने सुटका करावी. अशा मागणीची निवेदन दिले आहे.
यावेळी बोलताना सौ. दुर्गाताई तांबे म्हणाले की, हिंदू धर्म हा सहिष्णु असून मानवतेचा विचार देतो. बांगलादेशची निर्मिती हीच भारतीयांनी केली आहे. मात्र सध्या तेथील हिंदूंवर होणारे अत्याचार हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळे तातडीने भारत सरकारने त्या सरकारला सुनावले पाहिजे. याचबरोबर सर्व हिंदू धर्मीयांना संरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान हे निवेदन प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांनी स्वीकारले. तर यावेळी बांगलादेशचा निषेध करत घोषणाबाजी देखील करण्यात आली.
सकल हिंदू समाजाच्या मोर्चास पाठिंबा - डॉ. जयश्रीताई थोरात
बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात उद्या मंगळवार दिनांक १० डिसेंबर रोजी होत असलेल्या संगमनेर मधील सकल हिंदू समाजाच्या मोर्चास काँग्रेस पक्षाचा व आपला जाहीर पाठिंबा असून या मोर्चामध्ये काँग्रेस पक्ष, विविध संस्था व सहकारी संघटना सहभागी होणार असल्याचेही डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सांगितले.