सहकारमहर्षी व डॉ. शिंदे यांचे ग्रामीण विकासात मोठे योगदान - शाहू छत्रपती

संगमनेर Live
0
सहकारमहर्षी व डॉ. शिंदे यांचे ग्रामीण विकासात मोठे योगदान - शाहू छत्रपती 

◻️ तालुक्यातील सहकार मोडायला निघालेल्याना वेळीच रोखा - बाळासाहेब थोरात

◻️ राजेश टोपे, डॉ. रावसाहेब कसबे आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा प्रेरणा दिनानिमित्त गौरव

संगमनेर LIVE | छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांचा विचार घेऊन या परिसरामध्ये स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी कार्य केले आहे. सहकार व शेती क्षेत्रातील त्यांनी केलेले कार्य हे महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात मोठे योगदान देणारे असल्याचे गौरवोद्गार कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी काढले. 

तसेच बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासामध्ये संगमनेर तालुका हा राज्यातील पहिल्या तीन मध्ये असल्याचा गौरव माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला.

संगमनेर येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात खा. शाहू छत्रपती महाराज बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात होते.

माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार सत्यजित तांबे, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार मोहनदादा जोशी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, सौ. कांचनताई थोरात, सौ. दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, बाबा ओहोळ, सौ. प्रभावतीताई घोगरे, दशरथ सावंत, मधुकरराव नवले, राजवर्धन थोरात आदी उपस्थित होते.

खा. शाहू छत्रपती महाराज म्हणाले की, भाऊसाहेब थोरात आणि डॉ. आण्णासाहेब शिंदे यांचा वारसा बाळासाहेब थोरात यांनी समर्थपणे जपला आहे. भाऊसाहेबांनी सहकारातून तालुका समृद्ध केला तर अण्णासाहेबांनी देशात हरितक्रांती आणली. हे चांगले दिवस त्यांच्यामुळे आहे. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील संगमनेरचा सहकार पाहून आनंद झाला. राज्यात सध्या अस्थिर परिस्थिती आहे. परंतु पुन्हा एकदा महाराष्ट्र घडवण्यासाठी बाळासाहेबांच्या नेतृत्वाची राज्याला गरज आहे. अपघात झाला असेल परंतु त्यातून सावरून कार्यकर्त्यानी तालुका सांभाळावा. कारण बाळासाहेबांसारखे नेतृत्व हे सध्याच्या राजकारणात दुर्मिळ आहे. चांगल्या विचारांचा वारसा जोपासणाऱ्या या नेतृत्वाला ताकद द्या असे ते म्हणाले‌.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, दोन विभूतींच्या महान कार्यातून हा परिसर उभा राहिला आहे. राज्यातील पहिल्या विकसित तीन तालुक्यांमध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील संगमनेर तालुक्याचा समावेश आहे. जय पराजय होत असतात. येणारे दिवस आपलेच असतील. त्यामुळे भाऊसाहेबांनी लावलेले विकासाचे झाड सुकू देऊ नका. बाळासाहेब थोरात ते शांत संयमी नेते आहे त्यांचे मार्गदर्शन आम्हा सर्वांना कायम हवे आहे.
सध्याचे राजकारण हे बदल्याचे झाले आहे. यातून महाराष्ट्राचे नुकसान होत असून पुन्हा एकदा चांगले राजकारण करण्यासाठी सर्वांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कटिबद्ध राहावे असे आवाहन केले.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, तालुक्यातील आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यात तीर्थरूप भाऊसाहेब व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचे मोठे योगदान आहे. यशवंतराव चव्हाण यांनी डॉ. अण्णासाहेब शिंदे, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यासारखे हिरे राज्यात शोधले आणि त्यातून ग्रामीण विकास साधला. डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्यामुळे माळरानावर कारखाना उभा राहिला. त्यांनी देशाला, राज्याला मार्गदर्शन करताना संगमनेर तालुक्याला ही सातत्याने मार्गदर्शन केले. आज ९.५ लाख उत्पादन करणारा संगमनेर तालुका हा सहकाराचा तालुका म्हणून ओळख निर्माण झाली आहे. संगमनेरचा सहकार तीर्थरूप दादांनी वाढवला असून तो आपण सर्वांनी जपला पाहिजे. काही लोक मोडण्याचा प्रयत्न करतील. त्यांना वेळीच रोखले पाहिजे असेही ते म्हणाले.

माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले की, शिस्त आणि नैतिकतेतून या परिसराचा विकास झाला आहे. भाऊसाहेब व अण्णासाहेब हे सर्वसामान्यांसाठी जगले. त्यांचा विचार हा बाळासाहेबांनी जोपासला आहे. उच्च कोटीची सकारात्मकता संयम असे व्यक्तिमत्त्व बाळासाहेब थोरात यांचे असून त्यांच्या कार्यकाळात विविध तालुक्यांमध्ये महसूलच्या व प्रशासकीय विभागाच्या अनेक इमारती उभ्या राहिल्या आहेत. कारखान्यासह सर्व सहकाराचा चोख कारभार चालवताना त्यांनी सर्वांसमोर आदर्श ठेवला असून सध्या राज्यात जाती धर्माचे वाढलेले राजकारण चिंताजनक असल्याचे ते म्हणाले.

डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले की, भाऊसाहेब व अण्णासाहेब यांनी डाव्या विचाराच्या तालुक्यांना निर्मितीक्षम बनविले. यावेळी मधुकरराव नवले, करण ससाणे, सचिन गुजर, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, संपतराव मस्के, उत्कर्षा रूपवते, विजय बोराडे, अरुण कडू, प्राचार्य केशवराव जाधव व प्रा. बाबा खरात यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान या कार्यक्रमाचे स्वागत ॲड. माधवराव कानवडे यांनी केले. प्रास्ताविक मा. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. सभापती शंकर खेमनर यांनी आभार मानले.

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने कृषी, तंत्रज्ञान, शिक्षण, समाजसेवा व पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांना तर सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण, क्षेत्रातील स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांना देण्यात आला. यावेळी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्या वतीने सहकारातील नेतृत्व पुरस्कार माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना देण्यात आला. एक लाख रुपये रोख सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !