पिंप्री - लौकी अजमपूर शिवारातील शौचालयात बिबट्या बंदिस्त!
◻️ शेतीला दिवसा वीज पुरवठा करुन शेतकऱ्यांची बिबट्याच्या दहशतीतून मुक्तता करा - प्रा. कान्हु गिते
◻️ वन विभागाने शिताफीने बिबट्या ताब्यात घेऊन निसर्गात केला मुक्त
संगमनेर LIVE (आश्वी) | रविवारी दि. ५ जानेवारी रोजी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील पिंप्री - लौकी अजमपूर येथील देवीच्या मळ्यात शेतकरी महादेव भिवराज गिते यांच्या गट नं १२ मधील घरा समोरील शौचालयात भक्ष्याचा पाठलाग करताना मादी बिबट्या अडकला होता. यानंतर वनविभागाने या मादी बिबट्याला ताब्यात घेऊन निर्सगाच्या सोडल्याची माहिती संतोष पारधी यांनी दिली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मध्यरात्री घराबाहेर आवाज येत असल्याने महादेव गिते यांनी बाहेर डोकवुन बघितले असता बिबट्याचा शौचालयातून आवाज येत होता. मात्र बाहेर येता येत नसल्याने बिबट्या हा जोर -जोरात दरवाजाला धडका देत होता. त्यामुळे घाबरलेल्या गिते कुटुंबाने प्रसंगावधान राखत दरवाजाला बाहेरून कडी लावली आणि तात्काळ वन अधिकारी हरिचंद्र जोजर यांना माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वन अधिकारी जोजर यांनी वनपरीक्षेत्र अधिकारी संगमनेर भाग ३ चे सुभाष सांगळे यांना योग्य त्या सुचना दिल्या. त्यामुळे सुभाष सांगळे व वनपरिमंडळ अधिकार सुहास उपसनी यांचे सहकारी असलेले संतोष पारधी, गजानन पवार, वाहन चालक रामभाऊ वर्पे यांनी मोठ्या शिताफीने शौचालयात अडकलेला बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद केला. त्यामुळे गिते कुटुंबासह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दरम्यान वीज पुरवठा रात्री होत असल्यामुळे शेतीला पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन रात्रीच्या वेळी शेतात जावे लागते. त्यामुळे शेतकरी व बिबट्याचे आमने - सामने येण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे शेतीला दिवसा वीज पुरवठा करुन शेतकऱ्यांची बिबट्याच्या दहशतीतून मुक्तता करावी. तसेच वनविभागाने देखील योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी जेष्ठ कार्यकर्ते प्रा. कान्हु गिते यांनी केली आहे.