ज्ञानगंगा विद्यानिकेतनने श्रमदान स्पर्धेत पटकाविला राज्यात द्वितीय क्रमांक
◻️ मांचीहिल संकुलातील शाळेचे सलग दुसऱ्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत सुयश
◻️ राज्यभरातील २०० शाळेमधील ५० हजार विद्यार्थी झाले होते स्पर्धेत सहभागी
संगमनेर LIVE | पुणे येथील मातृ मंदिर विश्वस्त संस्थाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय समूहगान व श्रमदान स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेमध्ये संगमनेर तालुक्यातील मांचीहिल येथील ज्ञानगंगा विद्यानिकेतन या शाळेने श्रमदान स्पर्धेमध्ये राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तसेच समुहगान स्पर्धेमध्ये देखील विभाग स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेमध्ये राज्यभरातील सुमारे दोनशे शाळांमधील ५० हजार विद्यार्थ्यानी सहभागी झाले होते. तसेच कर्नाटक, मध्यप्रदेश व गुजरात या राज्यांनीही यामध्ये सहभाग घेतला होता. नुकताच पुणे येथे या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी जेष्ठ तबला वादक पंडित रामदास पळसुले यांच्या हस्ते ज्ञानगंगा विद्यानिकेतन शाळेचे प्रा. प्रदीप जगताप आणि प्रा. शशिकांत देशमुख यांच्याकडे सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम प्रदान करण्यात आली.
सलग दुसऱ्या वर्षी ज्ञानगंगा विद्यानिकेतनने श्रमदान स्पर्धेमध्ये राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे संस्थाप्रमुख अॅड. शाळीग्राम होडगर, संचालिका नीलिमा गुणे, प्राचार्य विजय पिसे, उपप्राचार्य गंगाधर चिंधे यांनी विद्यार्थ्याचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. तर या यशस्वी विद्यार्थ्याना संगीत शिक्षक गणेश बिडवे यांच्यासह विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.