बाळासाहेब थोरात यांना सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार जाहीर
◻️डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन होणार गौरव
◻️ राजकीय, सामाजिक, सहकार व शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा सन्मान
संगमनेर LIVE | कॉग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सहकार, शिक्षण व कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दलचा यावर्षीचा अत्यंत प्रतिष्ठेचा सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा माजी खासदार सहकार चळवळीतील अग्रणी नेते स्व. गुलाबराव पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. पहिला पुरस्कार हा अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना प्रदान करण्यात आला होता.
महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत नेतृत्व असलेले लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी राज्य मंत्रिमंडळातून केलेल्या पायाभूत व ऐतिहासिक कामांमुळे कृषी, महसूल, शिक्षण, जलसंधारण या महत्त्वाच्या खात्यांना नवी भरारी मिळाली आहे. याचबरोबर काँग्रेसचे प्रांताध्यक्ष व विधिमंडळ पक्षनेते म्हणून सक्षमपणे जबाबदारी पार पाडली आहे. राष्ट्रीय कमिटीचे सदस्य म्हणूनही बाळासाहेब थोरात काम करत आहेत.
सहकारातून संगमनेर तालुका समृद्ध बनवताना सर्व सहकारी संस्था या देशाला दिशादर्शक ठरल्या आहेत. तर पायाभूत विकास कामांमुळे संगमनेर शहर व तालुका अग्रगण्य आहे. याचबरोबर निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी दिले आहे.
गावोगावी विकासाच्या योजना राबवणारे लोकनेते बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे आधारवड असल्याची प्रतिक्रिया यावर्षीचा सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार त्यांना जाहीर झाल्यानंतर कॉग्रेस कार्यकर्त्याकडून व्यक्त होत आहे.
रविवार २ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता भावी नाट्यमंदिर सांगली येथे ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्या शुभहस्ते हा मानाचा पुरस्कार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रदान केला जाणार असल्याचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान यापूर्वीही बाळासाहेब थोरात यांना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते उत्कृष्ट संसदपटू, यशवंतराव चव्हाण पुरस्कार यांसह विविध पुरस्कार मिळाले आहेत.