‘आनंददायी परीक्षा पॅटर्न' अंतर्गत जिल्हाधिकारी यांचा विद्यार्थ्याशी संवाद

संगमनेर Live
0
‘आनंददायी परीक्षा पॅटर्न' अंतर्गत जिल्हाधिकारी यांचा विद्यार्थ्याशी संवाद 

◻️ आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणाच्या बळावर परिक्षेला सामोरे जा - जिल्हाधिकारी

संगमनेर LIVE (अहिल्यानगर) | दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणाच्या बळावर परीक्षेला सामोरे जावे आणि यश संपादन करावे, अशा शुभेच्छा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी विद्यार्थ्यांना दिल्या आहेत.

'आनंददायी परीक्षा' उपक्रमांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे.

बालपणापासून केलेल्या शिक्षण साधनेची ही परीक्षा असून अशा महत्त्वाच्या प्रसंगी आई - वडिल,  शिक्षक आणि राज्यशासनही विद्यार्थ्यांसोबत असल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात जिल्हाधिकारी म्हणतात, विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

विद्यार्थ्यांनी लेखनातील मुद्देसूदपणा, एकाग्रता आणि अभ्यासातील सातत्य या त्रिसूत्रीच्या बळावर परीक्षा आनंददायी बनवावी. आवृत्ती, पाठांतर आणि अखंड स्मरणाच्या आधारे परीक्षेला सोपे करून घ्यावे. प्रत्येक विषयाच्या परीक्षेला सामारे जातांना दीर्घ श्वास घेवून चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवत उत्तरलेखनाला सुरूवात करावी. निकालानंतर आपले गुण आपलेच असल्याचा स्वाभीमान बाळगतांना महत्त्वाकांक्षी स्वप्नांची पूर्तता करावी, असे सालीमठ यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

दगडाला ज्याप्रमाणे पैलू पाडून हिरा तयार होतो, त्याप्रमाणे परिश्रमाने आपले आयुष्य घडवायचे आहे, अशा शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम या संकल्पनेअंतर्गत  आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिक्षणमंत्री दादा भुसे, तसेच मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावी - बारावी परीक्षा भयमुक्त, कॉपीमुक्त व निकोप वातावरणात पार पाडाव्यात यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. याअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने अहिल्यानगर जिल्ह्यात 'आनंददायी परीक्षा' उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत मान्यवरांचे प्रेरणादायी संदेश देणारे  व्हिडिओ, ऑडिओ आणि अनोख्या पत्राद्वारे शाळा -  महाविद्यालयाच्या पातळीवर शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यापर्यंत शुभेच्छा संदेश पोहोचवले जात आहेत. विविध माध्यमे आणि शासकीय कार्यालयांची यासाठी मदत घेतली जाणार आहे. 

कॉपीमुक्त परीक्षा शपथ, विद्यार्थ्यांच्या परीक्षेबद्दल सकारात्मक दृष्टिकोन वाढवण्यासाठी शिक्षकांमार्फत समुपदेशन, जनजागृती सप्ताह, शिक्षासुचीचे वाचन, परीक्षेत गैरमार्ग केल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव जागृती, परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी घ्यावयाचा आहार व आरोग्याची काळजी, शाळास्तरावर जनजागृती फेरी काढणे, राज्य मंडळाने तयार केलेली चित्रफीत दाखवणे, ग्रामसभा बैठकीमध्ये ग्रामस्थांना कॉपीमुक्तीबाबत आवाहन करणे आदी उपक्रम हाती घेण्यात येत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !