कमान कोसळल्या प्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल करा
◻️ संगमनेर येथे महायुती विरोधात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक
◻️ छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्याचे म्हणत व्यक्त केला संताप
संगमनेर LIVE | फक्त राजकीय उद्देश ठेवून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करणारे संगमनेरचे शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी व महायुतीचे समर्थक कार्यकर्ते यांच्या गलथान कारभारामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांची उभारलेली स्वागत कमान कोसळली असून यामुळे महाराजांच्या प्रतिमेचा अवमान झाल्यामुळे आयोजकांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यानी व संघटनांनी केली आहे.
यावेळी ते म्हणाले की, संगमनेर शहरांमध्ये शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मागील १६ वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सर्व राजकीय पक्ष व संघटना एकत्र येऊन साजरी करत होते. यामध्ये कधीही गटबाजी झाली नाही अत्यंत शांततेने व आनंदाने ही शिवजयंती साजरी होत होती आणि ही संगमनेर तालुक्याची खरी परंपरा होती.
मात्र यावर्षी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करून प्रशासनावर दबाव टाकून परवानगी मिळवली. प्रशासन परवानगी देत नसतानाही संगमनेर बस स्थानक परिसरामध्ये महायुतीच्या वतीने कमान उभारण्यात आली होती. मिरवणूक काढली गेली यामध्ये कोणतीही सुरक्षितता नव्हती. रोडवर राजकीय उद्देश ठेवून उभारलेली ही कमान अजिबात सुरक्षित नव्हती. आयोजकांचे याकडे लक्षही नव्हते. फ्लेक्स बाजी व सोशल मीडियावर दंग असणाऱ्या कार्यकर्त्यांनी याकडे कधीही लक्ष दिले नाही. असा गंभीर आरोप केला.
ते पुढे म्हणाले, राजकीय स्वार्थासाठी केलेली जयंती आणि कमान ही जनतेने ओळखली होती. त्यामुळे संगमनेर शहर व तालुक्यामधील जनतेने महायुतीच्या या देखाव्यांकडे पाठ फिरवली. महायुतीच्या कार्यकर्त्याकडून विनापरवानगी अनेक फ्लेक्स लावण्यात आले. या फ्लेक्स बाजीवर नव्या महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जोर असल्याने संगमनेर शहर विद्रूप होत आहे. याबाबत वेळोवेळी अनेक संघटनांनी विरोध सुद्धा केला आहे. मात्र प्रशासनही सत्ताधाऱ्यांचे गुलाम झाले असल्याने हे जाहिरात बाजीचे फ्लेक्स लोंबकळत असल्याची टीका केली.
फ्लेक्सचा अतिरेक व विद्रुपपणा संगमनेर मध्ये कधीही नव्हता. ऐन गर्दीमध्ये ही कमान कुणावर पडली असती तर मोठा अनर्थ झाला असता. ही कमान कोसळल्यामुळे काही विद्यार्थ्यांना दुखापत झाल्याचा आरोप देखील यावेळी केला.
याचबरोबर महाराजांची प्रतिमा आणि किल्ल्यांची रचना असलेल्या ही कमान पडल्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या गड किल्ल्यांची मोठी अवेहलन झाली असल्याचे म्हणत महायुती व संगमनेरचे लोकप्रतिनिधी यांची मोठी नाचक्की झाल्याची तोफ डागली.
दरम्यान निष्काळजीपणे काम करणाऱ्या या सर्व पदाधिकारी व आयोजकांवर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यासह विविध संघटनांनी केली.
आयोजकांवर गुन्हे दाखल करा..
छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड जगाचे दैवत आहे. भाजप महायुतीने कायम महाराजांचा अपमान केला आहे. महायुतीने उभारलेल्या कमानीवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा होती. महाराजांची प्रतिमा पडणे ही अत्यंत दुर्दैवी असून यासाठी कमान पडल्याने महाराजांच्या प्रतिमेचा अवमान झाला आहे. म्हणून या घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्व आयोजकांवर तातडीने गुन्हे दाखल करावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक यांनी केली आहे.