शेतीसाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब आवश्यक - मंत्री विखे पाटील

संगमनेर Live
0
शेतीसाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब आवश्यक - मंत्री विखे पाटील

◻️ सांगोला येथे २१ व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेचे उद्घाटन संपन्न

संगमनेर LIVE (लोणी) | पूर्वी शेतीसाठीच सिंचन व्यवस्था होती. परंतु औद्योगीकरण आणि शहरीकरणामुळे शेतीसाठी उपलब्ध पाणी कमी होत असल्याने, पारंपरिक सिंचन पद्धतीत बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा सिंचनासाठी शेतकऱ्यांनी वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

सांगोला महाविद्यालयात आयोजित २१ व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेत मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या परिषदेत आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी बापू पाटील, जलसंपदाचे सचिव डॉ. संजय बेलसरे आदींचा समावेश होता. या कार्यक्रमात विविध जिल्ह्यातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, महाराष्ट्र सरकारचे राज्याला पूर्णपणे दुष्काळमुक्त करण्याचे धोरण असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्याची कार्यवाही सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पुराचे अतिरिक्त पाणी वाया जाऊ नये म्हणून नदी जोड प्रकल्पांना चालना दिली जात आहे. राज्याची सिंचन क्षमता पूर्वी ३.८६ लाख हेक्टर होती, आता ती ५५ लाख हेक्टरवर पोहोचली आहे. यात आणखी वाढ करण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यावर जोर देऊन पाण्याचे व्यवस्थापन आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा प्रभावी वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

आज वातावरणातील बदलाचा मोठा परीणाम सिंचन व्यव्सथेवर होतो. यासाठी सोलर पॅनलच्या वापरामुळे धरणांवर वीज निर्मिती होईल आणि पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्याचे शासनाचे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. उजनी धरणात वाळू आणि गाळ जमा झाल्यामुळे पाण्याची साठवणूक क्षमता कमी झाली आहे, याबाबत लवकरच उपाय योजना करण्यासाठी विभागाचे प्रयत्न असल्याचे त्यांनी आश्वस्त केले.

यापुर्वी महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून स्व. बाळासाहेब विखे पाटील आणि गणपतराव देशमुख यांनी पाणी उपलब्ध होण्यासाठी मोठे काम केले. त्यांना दि. मा. मोरे यांच्यासारख्या अभ्यासू लोकांची साथ मिळाली. आज त्यांच्या प्रस्तावांना पुढे घेवून जाण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. महाराष्ट्र सिंचन सहयोग या संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या या परिषदेतून येणाऱ्या सूचना आणि शिफारसी राज्य सरकार निश्चित स्विकारेल आशी ग्वाही त्यांनी आपल्या भाषणात दिली.

प्रदूषण आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा..

मंत्री विखे पाटील यांनी नदीकाठच्या शहरांमधून प्रदूषणयुक्त पाण्याचा उत्सर्जनामुळे प्रभावित गावांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी एकत्रित पाणीसाठे करण्याबाबत विचार करण्याची आवश्यकता व्यक्त केली. अनेक धरणात गाळ साठल्याने पाणी क्षमता कमी झालेली असून धरणातील गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. या सिंचन परिषदेच्या माध्यमातून सिंचन व्यवस्थापनाबाबत नागरिकांच्या सूचना आल्यास शासन त्यावर सकारात्मक विचार करून त्या अनुषंगाने धोरण तयार करेल, असे त्यांनी नमूद केले.

सिंचन प्रकल्पांना गती..

जलसंपदाचे सचिव संजय बेलसरे यांनी सांगितले की, सांगोला तालुक्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सिंचन प्रकल्पांना गती देण्यात आली आहे. सिंचन व्यवस्थापनात आवश्यक बदल सुचवल्यास, त्या सूचना जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सोडविल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन..

यावेळी भारतीय हवामान खात्याकडून स्थापित स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटन जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या यंत्राद्वारे हवेतील तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, दिशा आणि पर्जन्यमानाची माहिती पुण्यातील हवामान विभागाला पाठविली जाते. ही माहिती व त्या अनुषंगाने आवश्यक सूचना स्थानिक शेतकऱ्यांना मोबाइलद्वारे पाठवण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

दरम्यान सिंचन परिषदेत सिंचन सहयोग संस्थेचे अध्यक्ष डॉ. दि. मा. मोरे आणि सांगोला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब आणि जलसंपदाचे योग्य व्यवस्थापन हे महाराष्ट्राच्या शेतीच्या भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. व यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळेल असे त्यांनी सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !