काकडी विमानतळ दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपी जेरबंद

संगमनेर Live
0

काकडी विमानतळ येथील दुहेरी हत्याकांडातील दोन आरोपी जेरबंद

◻️ स्थानिक गुन्हे शाखेकडून १२ तासाचे आत गुन्ह्याची उकल

संगमनेर LIVE | शनिवारी दि. ४ एप्रिल २०२५ रोजी रात्री साहेबराव पोपट भोसले (रा. दिघे वस्ती, पिंप्री रोड, काकडी ता. राहाता) यांचे राहते घरी अज्ञात आरोपीनी जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने प्राणघातक हत्यारांनी कृष्णा साहेबराव भोसले (वय - ३०) आणि साहेबराव पोपट भोसले (वय - ६०) यांना जीवे ठार मारले. तसेच साकरबाई साहेबराव भोसले (वय - ५५) सर्व रा. दिघे वस्ती, पिंप्री रोड, काकडी ता. राहाता यांना गंभीर जखमी करून मोटार सायकल व मोबाईल चोरून नेला होता.

याबाबत राहाता पोलीस स्टेशन गुरनं १७१/२०२५ बीएनएस २०२३ कलम १०३ (१), १०९(१), ३११, ३३१ (८) प्रमाणे गुन्हा दाखल करत पोलीस आरोपींचा शोध घेत होती.

काकडी येथील गंभीर गुन्हयांची माहितीताचं पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना गुन्हा घडकीस आणण्यासाठी सुचना दिल्या.

आदेश मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सपोनि हेमंत थोरात, पोसई तुषार धाकराव, अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, गणेश लोंढे, संदीप दरंदले, अमृत आढाव, प्रमोद जाधव, जालींदर माने, बाळासाहेब खेडकर, रमीजराजा आत्तार, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड, भगवान थोरात, सुनील मालणकर, बाळासाहेब गुंजाळ, अरूण मोरे, उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर यांची तीन पथक तयार केली आणि आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सुचना व मार्गदर्शन केले. 

दि. ५/४/२०२५ रोजी तपास पथके तांत्रीक विश्लेषण व बातमीदाराच्या आधारे गुन्हयाचा तपास करत असताना सदरचा गुन्हा करणारे दोन संशयीत इसम हे टेम्पोमधुन सिन्नर मार्गे नाशिककडे जात असलेबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीवरून पळशी टोलनाका, सिन्नर, जि. नाशिक येथे सापळा रचुन संशयीत इसमांचा शोध घेऊन एका टेम्पोमध्ये पाठीमागील बाजुस बसलेले संशयीत दोन इसम मिळून आले.

यावेळी संदीप रामदास दहाबाड (वय - १८), जगन काशिनाथ किरकिरे (वय - २५) दोन्ही रा. तेलीम्बरपाडा, ता. मोखाडा, जि. पालघर यांना ताब्यात घेतले. त्यांनतर त्यांना विचारपूस केली असता संदीप रामदास दहावाड याने त्याचे साथीदारासह रात्री १२.३० वा. सुमारास काकडी विमानतळ परिसरामधील एका घरामध्ये जाऊन दोन - तीन जणांना लाकडी दांडक्याने व फावडयाने मारहाण केली व चोरी केल्यानंतर पळून जात असलेबाबत माहिती सांगितली. 

ताब्यात घेण्यात आरोपी नामे संदीप रामदास दहाबाड, जगन काशिनाथ किरकिरे या दोघांनाही गुन्ह्याचे तपासकामी राहाता पोलीस स्टेशनला हजर करण्यात आले असुन पुढील तपास राहाता पोलीस ठाणे हे करीत आहे.

दरम्यान तपास पथकास संशयीत आरोपीतांचा शोध घेणेकामी सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांनी योग्य ती मदत केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !