सहकारमहर्षी सहकारी साखर कारखान्याचा आज आणि उद्या स्नेहमेळावा
◻️माजी मंत्री बाळासाहेब थोरात साधनार सभासद, शेतकरी व युवकांशी संवाद
संगमनेर LIVE | सहकारातून सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणारा संगमनेरचा सहकार हा देशासाठी दिशादर्शक ठरला असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये आज बुधवार दि. २३ एप्रिल व उद्या गुरुवार दि. २४ एप्रिल २०२५ रोजी तालुक्यातील विविध ठिकाणी सभासद शेतकरी युवक व हितचिंतकांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्शवादी विचारांवर संगमनेर मधील साखर कारखाना व सर्व सहकारी संस्थांचा कारभार हा राज्याला दिशादर्शक ठरला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सहकारी संस्थांनी तालुक्याच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम सभासद शेतकरी ऊस उत्पादक कामगार यांचे हित जोपासताना उच्चांकी भाव दिला आहे.
या कारखान्याचा स्वच्छ प्रामाणिक व पारदर्शक कारभार यामुळे सभासद शेतकरी नागरिक युवक महिला यांचा मोठा विश्वास कारखान्याच्या व्यवस्थापनावर आहे. २०२५ - ३० या वर्षाकरिता होऊ घातलेली निवडणूक ही बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध होण्याकडे वाटचाल सुरू आहे.
तालुक्यातील सर्व सभासद शेतकरी युवक महिला व हितचिंतक या सर्वांशी संवाद साधण्याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व विविध मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये आज बुधवार २४ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता कृष्णा लॉन्स नाशिक - पुणे हायवे गुंजाळवाडी येथे तर सकाळी ११ वाजता साई मंगल कार्यालय समनापुर, त्यानंतर सायं. ६ वा. जय मल्हार लॉन्स आशापीरबाबा रोड निमोन येथे व सायंकाळी ७.३० वा. महाराजा लॉन्स तळेगाव येथे स्नेहसंवाद मेळावा पार पडणार आहे.
तर उद्या गुरुवारी सकाळी ९ वा. रिद्धी सिद्धी मंगल कार्यालय जाखुरी येथे व सायंकाळी ६.३० वा. शिव ओंकार मंगल कार्यालय जोर्वे येथे स्नेहसंवाद मेळावा होणार आहे.
दरम्यान या स्नेहसंवाद मेळाव्यासाठी साखर कारखान्याचे सर्व सभासद, शेतकरी, युवक, हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी विकास मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.