आश्वी पंचक्रोशीत भारतरत्न डॉ. आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी
◻️ प्रतिमापूजन, मिरवणूक, स्नेह भोजन आणि महामानवाच्या विचारांचा दिवसभर जागर
संगमनेर LIVE (आश्वी) | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती सोमवारी संगमनेर तालुक्यातील आश्वी पंचक्रोशीतील गावांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ठिक - ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतेषबाजी, मिरवणुकीसह स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील जिल्हापरिषद शाळा, भिमगर्जना तरुण मित्र मंडळ, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले प्रतिष्ठान व राजमाता अहिल्यादेवी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महामानवाला अभिवादन करण्यात आले. त्याचंबरोबर आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, दाढ खुर्द, प्रतापपूर, पिंप्री - लौकी अजमपुर, शिबलापूर, पानोडी, मालुजें, ओझर आदि गावांसह पंचक्रोशीतील विविध ग्रामपंचायतीमध्ये महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
दरम्यान बहुतांश गावांमध्ये सायंकाळी मिरवणूकाचे आयोजन करण्यात आल्यामुळे या मिरवणूका शांततेत पार पाडाव्यात आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आश्वी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे सर्वत्र जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरा करण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आणि कोट्यावधी देशवासीयांच्या स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. शिक्षण, समानता आणि न्यायाच्या बळावर सामाजिक क्रांतीचा पाया रचणाऱ्या डॉ. आंबेडकरांनी आयुष्यभर वंचितांच्या हक्कांसाठी कष्ट घेतले. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या तत्वांवर आधारित संविधान तयार करून त्यांनी भारताच्या महान लोकशाहीचा मजबूत पाया रचला. त्यामुळे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही आपल्या सर्वाना प्रेरणा देतात. असे विचार ठिक - ठिकाणी झालेल्या जयंती उत्साहात मान्यवरांनी मांडले.