ज्येष्ठ दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन
◻️ देशभक्तीपर चित्रपटाचा अस्सल आयकॉन काळाच्या पडद्याआड
◻️ शिर्डीचे साईबाबा यांची महती जगभरात पोहचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा
संगमनेर LIVE | 'रोटी, कपडा और मकान' आणि 'क्रांती' सारखे उत्कृष्ट चित्रपट देणारे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. 'पूरब और पश्चिम' चित्रपटातील 'भारत का रहे वाला हूं, भारत की बात सुनाता हूं' हे गाणे आजही सर्वांच्या ओठावर आहे. 'दो बदन', 'हरियाली और रास्ता' आणि 'गुमनाम' सारख्या हिट चित्रपटांसाठीही ते ओळखले जात.
भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. देशभक्तीपर चित्रपटांसाठी त्यांची ओळख होती. देशभक्तीपर चित्रपटांसाठी त्यांना 'भारत कुमार' म्हणूनही ओळखले जात होते. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या वृत्तानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.
वैद्यकीय अहवालानुसार, 'भारत कुमार' या नावाने प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्याने पहाटे ४.०३ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. मनोज कुमार गेल्या काही महिन्यांपासून यकृत सिरोसिसने त्रस्त असल्याची पुष्टीही अहवालात करण्यात आली आहे. २१ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मनोज कुमार यांचे भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान नेहमीच स्मरणात राहील. त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यांच्या नावावर विविध श्रेणींमध्ये एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सात फिल्मफेअर पुरस्कार आहेत. भारतीय कलेतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल, सरकारने त्यांना १९९२ मध्ये पद्मश्री देऊन सन्मानित केले. त्यांना २०१५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल ‘महान दादासाहेब फाळके पुरस्काराचे मानकरी, आमचे प्रेरणास्थान आणि भारतीय चित्रपटसृष्टीचे 'सिंह' मनोज कुमारजी आता आमच्यात नाहीत. हे चित्रपटसृष्टीचे खूप मोठे नुकसान आहे आणि संपूर्ण इंडस्ट्रीला त्याची उणीव भासेल. अशा प्रतिक्रीया चित्रपट सृष्टीतून येत आहे. तर, ब्लॅक अँड व्हाईटच्या पिढीतला अखेरचा शोमॅन गेल्याची भावना त्यांच्या चाहत्यांनी व्यक्त केली.
दरम्यान मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी होते. अनेक उत्तम देशभक्तीपर चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. तर, शिर्डीचे साईबाबा यांची महती जगभरात पोहचवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे त्यांचे नाव शिर्डी येथील साईमंदिर परिसरातील रस्त्याला देखील देण्यात आले आहे.