श्री साई संस्थान व ग्रामस्थांनी ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांना वाहिली श्रद्धांजली
◻️ ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटामुळे देशभरात साईबाबांविषयी श्रद्धा वाढली
संगमनेर LIVE | ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक मनोज कुमार यांचे आज शुक्रवारी दि. ४ एप्रिल २०२५ रोजी मुंबई येथील रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीसह साईभक्तांमध्ये शोककळा पसरली आहे.
देशभक्तिपर सिनेमांसाठी ओळखले जाणारे मनोज कुमार यांनी शहीद, उपकार, पूरब और पश्चिम व रोटी कपडा और मकान या चित्रपटांमधून रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं.
साई भक्तांच्या दृष्टीने त्यांच्या ‘शिर्डी के साईबाबा’ या १९७७ साली प्रदर्शित चित्रपटातील भूमिकेने अनन्यसाधारण स्थान मिळवले. एका शंका घेऊन आलेल्या डॉक्टरचा साईबाबांवरील गाढ श्रद्धेत झालेला रूपांतरण प्रवास त्यांनी हृदयस्पर्शी पद्धतीने साकारला. या चित्रपटामुळे देशभरात साईबाबांविषयी श्रद्धा वाढीस लागली.
त्यांच्या या अमूल्य योगदानाच्या सन्मानार्थ शिर्डीतील पिंपळवाडी रोड या मुख्य रस्त्याला ‘मनोज कुमार गोस्वामी रोड’ असे नाव दिले आहे.
मनोज कुमार यांना पद्मश्री (१९९२) व दादासाहेब फाळके पुरस्कार (२०१५) या मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच साईचरणी प्रार्थना. अशा भावना श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेने कळविल्या आहे.
दरम्यान शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने संस्थानच्या शताब्दी मंडपात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.