शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी डॉ. जयश्री थोरात थेट बांधावर!
◻️अवकाळी पावसाने नुकसान केलेल्या पठार भागातील पिकांची केली पाहणी
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील काही भागांमध्ये काल बुधवारी अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून हाताशी आलेले पीके वाया गेली आहेत. यामुळे शासनाने कोणतीही फार्सबाजी न करता त्वरित पंचनामे करून तातडीने जास्तीत जास्त मदत द्यावी. अशी मागणी डॉ. जयश्री थोरात यांनी केली.
सावरगाव तळ, खांडगाव, कौठे धांदरफळ यासह पठार भागातील विविध गावांमधील शेती पिकांची त्यांनी पाहणी केली. पांडुरंग घुले, सावरगावचे पोलीस पाटील गोरख नेहे, संदीप थिटमे, पोपट थिटमे, राहुल फापाळे, संदीप दत्तू थिटमे, शैला थिटमे, माधुरी नेहे, गोरक्ष थिटमे, राहुल नेहे, लक्ष्मण नेहे, शांताराम नेहे, सचिन येंधे, सुधीर वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. मात्र संघर्ष हा त्याच्या जीवनात कायम असतो. मोठ्या कष्टातून त्याने पीक उभे केले आहे. एका बाजूला शेतीमालाला भाव नाही आणि दुसऱ्या बाजूला अस्मानी संकट अशा दुहेरी संकटामध्ये तो सापडला आहे.
सरकारने कायम शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे असून निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली होती. ती हवेत विरली. आता कर्जमाफी दिली जाणार नाही. एका बाजूला शेतकऱ्यांवर कर्जाचा मोठा डोंगर आहे. अनेक अडचणीतून तो पिक उभा करतो. बाजार भाव मिळत नसल्याने आर्थिक परिस्थिती खालावते कर्ज वाढते. म्हणून खरे तर सरकारने सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे.
याचबरोबर अवकाळी आणि अस्मानी संकट आणि नुकसान झाल्यास तातडीने मदत दिली पाहिजे. मात्र विद्यमान सरकारी फक्त फार्सबाजी आणि जाहिरात बाजी करते. निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने दिली आणि ती आता खोटी ठरली आहेत.
या उलट उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी मंत्रिमंडळाच्या काळात विना आठ दोन लाखापर्यंत ची कर्जमाफी केली होती. त्याचबरोबर अनेक संकटांमध्ये शेतकऱ्यांना मदत झाली होती. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठी मदत मिळून दिली होती.
काल अवकाळी ची परिस्थिती काढताच काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने पंचनामे करून लवकरात लवकर मदत देण्याची मागणी केली. यावर सरकारने सकारात्मक भूमिका दर्शवली आहे.
दरम्यान याप्रसंगी डॉक्टर जयश्री थोरात यांनी वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला आहे.