मुळा नदीवरील मोरेवाडी धरणासाठी पाठपुरावा सुरू - बाळासाहेब थोरात
◻️ साकुरसह पठार भागातील सभासदाशी साधला स्नेहसंवाद
संगमनेर LIVE | आमदारकी ही माझ्यासाठी नव्हती तर तुमच्या सगळ्यांसाठी होती. सगळ्या सहकारी संस्थांना संरक्षण देणारे आमदारकीचे कवच होते. तालुक्याच्या विकासाची वाटचाल व सहकार टिकवण्यासाठी यापुढे सर्वांना एकत्र राहावे लागणार असून मोरेवाडी धरण व्हावे ही आपली इच्छा होती. पुढील पाच वर्षात धरण पूर्ण करण्याची संकल्पना होती. ते धरण झाले पाहिजे अशी मागणी करताना मोरवाडी धरणासाठी आपला पाठपुरावा कायम सुरू राहील असे प्रतिपादन काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
संगमनेर तालुक्यातील साकूर येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सभासद व युवक हितचिंतकांसाठी आयोजित स्नेहसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. शेतकरी विकास मंडळाचे जेष्ठ नेते बाजारीव खेमनर, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, सभापती शंकर खेमनर, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री थोरात, गणपत सांगळे, पांडुरंग घुले, आर. बी. राहणे, विठ्ठल भागवत, इंद्रजीत खेमनर, वकील अशोक हजारे, साहेबराव बारवे, यांच्यासह नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेक अफवा पसरवल्या गेल्या. दिशाभूल केली. मात्र विधानसभेला बसलेल्या धक्क्यानंतर आपण साखर कारखान्याची विशेष काळजी घेतली. दोन महिने सभासदांशी थेट संपर्क साधला. यामुळे विरोधकांनाही जाणवले की विधानसभेसारखी चूक कारखान्याच्या निवडणुकीत होणार नाही. सर्व सभासदांचा स्पष्ट निर्णय होता की कारखाना शेतकरी विकास मंडळाकडेच राहायला हवा. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे आज कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली, असे सांगत लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. ही एकजूटच आपली खरी ताकद आहे. पुढेही आपल्याला अशाच प्रकारे संघटित राहून प्रत्येक आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
मोरेवाडी धरणाच्या गरजेवरही भर दिला. तुमच्या भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मोरेवाडी येथे एक छोटेसे धरण व्हावे, ही माझी कल्पना होती. सर्वेक्षण देखील झाले होते. जर आपले सरकार सत्तेत आले असते, तर हे काम मार्गी लागले असते, असे ते म्हणाले. पिंपळगाव खांडसारखे मोठे धरण होऊ शकते, तर मोरेवाडी येथे का नाही? आता आपल्या सर्वांच्या दृष्टीने मोरेवाडी येथे धरण होणे अत्यावश्यक आहे. वेळप्रसंगी धरणासाठी आग्रह धरा. त्यांना श्रेय गेले तरी मला हरकत नाही, कारण माझा हेतू फक्त धरण व्हावे हाच आहे. पुढच्या शंभर पिढ्या तरी सुखी होतील, असे त्यांनी ठामपणे सांगितले. या विषयात राजकारण न करता एकच ध्येय समोर ठेवा. धरण व्हावं आणि गावांचं भविष्य उज्ज्वल व्हावं, असे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
कारखान्याच्या प्रत्येक जागेसाठी पाच - पाच अर्ज दाखल झाले होते. निवडणूक बिनविरोध होणे सोपे नव्हते. मात्र अशा कठीण परिस्थितीतही आपण सर्वांनी एकमेकांवर विश्वास ठेवून, संवाद साधून, अखेर बिनविरोध निवडणूक साध्य केली, असे सांगून माजी मंत्री थोरात यांनी कार्यकर्त्यांचे विशेष कौतुक केले. यासाठी तुम्ही सर्वांनी दाखवलेली साथ महत्वाची आहे. याच एकजुटीमुळे आपल्या कारखान्याचा आलेख आजपर्यंत चढताच राहिला आहे, असेही त्यांनी नमूद केले. यापुढे ऊस उत्पादन वाढवण्यासाठी नवनवीन प्रयोग करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी साकुर पठार भागातील विविध गावांमधील सभासद शेतकरी व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडणूकाजवळ आल्या की, काहीजण ऊस उत्पादक शेतकर्यांना जास्त भाव देतात. मात्र, आपल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने पहिल्यापासूनच चांगला भाव दिला आहे. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नेहमीच सर्वांना बरोबर घेऊन काम केले आहे. तुम्ही चांगली साथ दिली आहे. याचबरोबर हजारो कुटुंब या साखर कारखान्यावर अवलंबून आहे. म्हणून हा सहकार टिकवण्याचे काम भविष्यात आपल्या सर्वांना करायचे आहे. अशा भावना डाॅ. जयश्री थोरात यांनी व्यक्त केल्या.