कॉग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे गुजरातची जबाबदारी
◻️ काँग्रेस संघटन सृजन अभियानातून संविधान रक्षण - बाळासाहेब थोरात
◻️ सुरत येथे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद
संगमनेर LIVE | महाराष्ट्रातील काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी गुजरात मधील १२ मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्याशी संवाद साधला. काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानांतर्गत संविधान रक्षणासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र होऊन अधिक काम करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
गुजरातमधील सुरत येथे १२ मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री भरतसिंग सोळंकी, माजी खासदार किशनभाई पटेल, माजी अध्यक्ष परिमल राणा, सुरतचे अध्यक्ष धनसुख राजपूत, कार्यकारी अध्यक्ष विपुल उदानवाला, दिनेश सावलिया, मीडिया समन्वयक कल्पेश बारोट आदि पदाधिकारी उपस्थित होते.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्रातील सुसंस्कृत, स्वच्छ प्रतिमा व एकनिष्ठ असलेले नेतृत्व आहे. महाराष्ट्रातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातून आठ वेळा विक्रमी मताधिक्याने प्रतिनिधित्व करताना त्यांनी राज्य मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण, जलसंधारण, पाटबंधारे, रोजगार हमी योजना, खार जमीन अशा विविध मंत्री पदांची जबाबदारी अत्यंत सक्षमपणे सांभाळली होती.
याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना अत्यंत अडचणीच्या काळामध्ये ४४ आमदार विधानसभेमध्ये निवडून आणले होते. तर २०१९ ते २४ या काळात विधिमंडळ गटनेते म्हणूनही काम केले. याचबरोबर काँग्रेसच्या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य असून त्यांच्याकडे यापूर्वीही गुजरात निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती.
नुकतीच आहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक थोरात यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली असून काँग्रेसने गुजरात मधील विविध मतदार संघाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. यानंतर सुरत मध्ये त्यांनी विविध कार्यकर्त्याशी संवाद साधला.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी व देश उभारणीमध्ये काँग्रेसचा महत्त्वपूर्ण वाटा असून काँग्रेस हा विचारांचा पक्ष आहे. सध्या लोकशाही धोक्यामध्ये आली आहे. लोकशाही व संविधानाचे रक्षण करणे गुजरात मध्ये काँग्रेस बळकट करणे याकरता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन सृजन अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. याचबरोबर आगामी काळामध्ये काँग्रेस अधिक ताकतीने संघर्ष करेल असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान यावेळी गुजरात मधील काँग्रेसचे विविध पदाधिकारी महिला युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.