जिल्हा परिषद शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करा - जिल्हाधिकारी

संगमनेर Live
0
जिल्हा परिषद शाळांमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करा - जिल्हाधिकारी

◻️ राहाता तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिले निर्देश 

संगमनेर LIVE (शिर्डी) | जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी व पुरेशा प्रकाश या मूलभूत सुविधा उपलब्ध कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिल्या.

राहाता तहसील कार्यालयात आयोजित विविध विभागांच्या तालुकास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, शिर्डी नगरपरिषद मुख्याधिकारी सतिष दिघे, राहाता मुख्याधिकारी वैभव लोंढे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

डॉ. आशिया म्हणाले, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी, शनि शिंगणापूर परिसराचा कुंभ सर्किट म्हणून विकास करण्यात येणार आहे. देशह - विदेशातून येणाऱ्या भक्तांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

पोलीसांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत. रस्ता सुरक्षेला प्राधान्य देताना अपघातप्रवण स्थळांना बांधकाम व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त भेटी देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.

कृषी विभागाचा आढावा घेतांना ते म्हणाले, फळबाग व मुख्यमंत्री कृषी अन्न प्रक्रिया योजनांचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांचा फलनिष्पत्ती अहवाल तयार करण्यात यावा. जलयुक्त शिवार, गाळमुक्त धरण - गाळयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. 

पंचायत समितीच्या आढाव्याप्रसंगी ते म्हणाले, शहरालगत असलेल्या प्रत्येक गावात कचरा संकलनासाठी घंटागाडींची व्यवस्था करावी. जलजीवन मिशन, स्वच्छ भारत अभियान आदी योजनांचाही त्यांनी याप्रसंगी आढावा घेतला.

शिर्डी नगरपरिषद क्षेत्रातील स्वच्छता, अवैध बांधकामांवर करण्यात आलेली कार्यवाही, भटक्या कुत्र्यांवर केलेली कार्यवाही, फेरीवाला क्षेत्र, ई-रीक्षा, पीएम विश्वकर्मा, पीएम आवास योजनेचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

राहाता नगरपरिषदेने विकास आराखड्यातील रस्त्यावरील अतिक्रमण त्वरित काढावे. पीएम स्वनिधी, पीम विश्वकर्मा योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यात यावा‌, असेही डॉ. आशिया म्हणाले.

मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. मागेल त्याला सोलर योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ द्यावा. पीएम सुर्यघर योजनेविषयी शहरी भागात जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात यावा, अशा सूचना त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यावर आरोग्य विभागाने भर द्यावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बैठकीपूर्वी, जिल्हाधिकारी श्री‌. आशिया यांनी शिर्डी येथील शेती महामंडळाच्या जागेत सुरू असलेल्या महसूल भवन, ऑडिटोरियम आणि प्रशिक्षण सभागृहांच्या बांधकामांची पाहणी केली. कामाची गुणवत्ता कायम ठेवत, काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. शिर्डी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कामांची ही त्यांनी पाहणी केली. 

महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत फळबाग योजनेचा लाभ मिळालेले कोकमठाण (ता.कोपरगाव) येथील शेतकरी सुभाष थोरात यांच्या शेतात त्यांनी भेट देऊन त्यांच्याशी त्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्री अन्न प्रक्रीया उद्योगाच्या माध्यमातून अनुदान प्राप्त कोकमठाण येथील कृषी प्रकल्पासही त्यांनी भेट दिली. संवत्सर येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन तेथील विज्ञान प्रकल्पाची त्यांनी माहिती घेतली. यावेळी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, तहसीलदार महेश सावंत, नायब तहसीलदार हेमंत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हिमांशू चव्हाण आदी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !