ऊस उत्पादक सभासदांचा पैसा आणि प्रतिष्ठा वाचविण्यासाठी निवडणुकीतून माघार
◻️ शेतकरी नेते संतोष रोहम यांनी संगमनेर कारखाना निवडणुकीवर स्पष्ट केली भुमिका
संगमनेर LIVE | संगमनेर साखर कारखाना निवडणुकीत विरोधकांनी माघार घेतली म्हणजे ती हार नाही. तर, सभासदांचा पैसा आणि प्रतिष्ठा वाचवण्याबरोबरचं सहकार टिकला पाहिजे. हा हेतू डोळ्यासमोर ठेवून विरोधकांनी संगमनेर कारखान्याची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. पुढील निवडणुकीच्या वेळी आम्ही हा सर्व अन्याय जनतेसमोर उघडपणे मांडून सभासदाच्या हितासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरू. अशी भुमिका शेतकरी नेते संतोष रोहम यांनी संगमनेर कारखाना निवडणुकीबाबत मांडली आहे.
याबाबत प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात रोहम म्हणाले की, संगमनेर सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून जीवाची, श्रमाची व पैशाची गुंतवणूक करणाऱ्या खऱ्या सभासदांनाच या निवडणुकीपासून दूर ठेवण्याचं एक सुनियोजित षड्यंत्र सत्ताधाऱ्यांनी रचल्याचा गंभीर आरोप रोहम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला.
आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व ऊस उत्पादक सभासदानी एकत्र ऐवून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. त्यासाठी सभासदांच्या बैठका घेऊन त्यांचा विश्वास प्राप्त केला. परंतु अर्ज भरण्याच्या टप्प्यावर मतदार यादीवर आक्षेप घेण्याचा कालावधी कमी ठेवण्यात आला. सभासदांना यादी मिळालीच नाही.
पोट नियमामध्ये केलेल्या दुरुस्त्या, सलग तीन वर्ष ऊस पुरवणारा सभासदच निवडणूक लढवू शकेल. जनरल मीटिंगसाठी उपस्थित राहणारा सभासदच उमेदवारी करू शकेल, असे नियम थेट विरोधकांना निवडणुकीपासून वंचित ठेवण्यासाठीच रचले गेले.
जनरल मीटिंगमध्ये विरोधी सदस्यांना बोलण्यापासून रोखणं, त्यांचा अपमान करणं, सभागृहात गावगुंडांच्या माध्यमातून दबाव टाकणं, हे सर्व प्रकार स्पष्टपणे लोकशाहीचा अन् सभासदांचा अपमान करणारे आहेत. हे सर्व कारस्थान लक्षात घेता ही निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतला. हे माघार घेणं म्हणजे पराभव नव्हे तर, हे एक यशस्वी निवडणूक युद्ध न लढताच जिंकण्याचं एक उदाहरण असल्याचे त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.