घुलेवाडी येथील मंजूर विकास कामे बाळासाहेब थोरात यांच्या निधीतील
◻️ नवीन लोकप्रतिनिधींनी माजी मंत्री थोरात यांच्या कामांचे श्रेय घेऊ नये - सीताराम राऊत
संगमनेर LIVE | माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी घुलेवाडीसाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षात विविध विकास कामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय अहमदनगर यांनी १ आक्टोबर २०२४ रोजी या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता देखील मिळाली होती. त्यामुळे या सर्व कामांचे आणि निधीचे श्रेय हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे असल्यामुळे तालुक्यातील नवीन लोकप्रतिनिधीने एक रुपया निधी न आणता बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये. असे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी गावातील विविध विकास कामांबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात राऊत यांनी म्हटले आहे की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमध्ये विकासाच्या योजना सातत्याने राबवल्या गेल्या आहेत. ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या मागणीवरून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांच्या माध्यमातून सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये घुलेवाडी मधील विविध विकास कामांसाठी दोन कोटींचा निधी मंजूर केला होता.
या कामाची प्रशासकीय मान्यता प्रशासकीय मंजुरीचे आदेश क्रमांक जीसकअ / प्रमा क्रमांक २ / ९८० /२०२४ - २५ दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी मंजूर करण्यात आले आहे. या कामांमध्ये घुलेवाडी गावठाण येथील पेव्हिंग ब्लॉक बसवणे, रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, बंदिस्त गटार, काँक्रिटीकरण रस्ता, ब्लॉक बसवणे, रस्ता डांबरीकरण म्हसोबा नगर मधील विविध विकास कामे, वीज पुरवठा, रस्ता मजबुतीकरण, बंदिस्त गटार अशा कामांचा समावेश आहे. या सर्व कामांसाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. त्या निधीतील ही सर्व काम आहेत.
मात्र विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी एक रुपयाचा नवीन निधी न आणता जुन्याच कामांचे उद्घाटन केले आहे. खरे तर नव्याने निधी आणून विकास कामे करायला हवी आहेत. मात्र नवीन लोकप्रतिनिधी हे फक्त काही लोकांना हाताशी धरून जाहिरात बाजी करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
तर, आलेला निधी हा बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून मिळालेला आहे . याचे श्रेय कुणीही घेऊ नये असे आवाहन करताना याबाबतचे मंजुरीचे पत्र सीताराम राऊत यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
ग्रामपंचायत मधील विकास कामांसाठी निधी हा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून मिळाल्याचे सरपंच सौ. निर्मला राऊत यांनी म्हटले आहे.
घुलेवाडी गाव हे मध्यवर्ती आहे लोकसंख्या मोठी असल्याने या गावासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या आहेत. पिण्याच्या पाण्याच्या सुविधा केल्या आहेत. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन भविष्यातील योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. ग्रामपंचायतने दिलेल्या मागणीनुसार १ आक्टोबर २०२४ रोजी या सर्व कामांसाठी निधी मिळालेला आहे. मात्र नवीन लोकप्रतिनिधीला याबाबत काही माहिती नाही असे सांगताना निधी आणा मग उद्घाटन करा. असे आव्हान लोकनियुक्त सरपंच सौ. निर्मला राऊत यांनी दिले आहे.