प्रवरेच्या वाटचालीत कामगारांचे महत्वपुर्ण योगदान - डाॅ. सुजय विखे पाटील
◻️ पद्मश्री विखे पाटील कारखाना येथे कामगार सेवानिवृत्त कार्यक्रम संपन्न
संगमनेर LIVE (लोणी) | प्रवरेचा कामगार हा आपल्या दृष्टीने कुटुंबाचा मुख्य घटक आहे. सहकार चळवळ वाढली पाहिजे. यासाठी सुरू असलेल्या आपल्या प्रयत्नाला खऱ्या अर्थाने कामगारांमुळे मोठे पाठबळ मिळाले. आपण केलेल्या प्रामाणिक कामामुळे आज विखे पाटील कारखाना हा प्रगतीपथावर असून आपण दिलेले योगदान हे महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरानगर आणि साखर कामगार सभा यांच्या संयुक्त विद्यामाने कामगाल दिनाचे औचित्य साधत आयोजित कारखान्यातील सेवानिवृत्त कामगारांच्या सत्कार समारंभामध्ये डॉ. विखे पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साखर कामगार सभेचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर होते. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे, उपाध्यक्ष सतीश ससाणे, साखर कामगार सभा अध्यक्ष ज्ञानदेव आहेर, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे आदींसह सर्व संचालक, कामगार उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, प्रवरेच्या सक्षम वाटचालीमध्ये प्रवरेच्या कामगारांचे योगदान हे महत्वपूर्ण राहिले आहे. प्रत्येक चढउतारामध्ये कामगार हे सोबत राहिले आहे. कारखान्याच्या प्रगतीमध्ये त्यांचा वाटा हा महत्त्वपूर्ण आहे. हा कार्यक्रम तुमच्यासाठी चांगला असला तरी माझ्या दृष्टीने वेदनादायी आहे. प्रवरेसाठी कायमच आपले योगदान देत रहा. विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून कायमच सर्वांना बरोबर घेऊन सहकार चळवळ आणि सामाजिक कार्य सुरू आहेत यामध्ये आपले योगदान हे महत्त्वपूर्ण राहिले आहे.
येणाऱ्या नवीन हंगामामध्ये कारखान्याचे नुतणीकरण पूर्ण होणार आहे. यामुळे कारखान्याचे गाळप क्षमता ही वाढणार आहे. कामगार, सभासद यांच्या दृष्टीने देखील चांगले निर्णय होतील असे सांगतानाच आज केवळ व्यक्तीदोषापोटी कारखान्यावरती आरोप होत आहेत. जे आरोप करतात त्यांनी कारखान्यासाठी काय योगदान दिले असे सांगून केवळ दिशाभूल करण्याचे काम काही ठराविक विरोधक करतात पण त्यांना अनेक वेळा धडा शिकवला आहे आणि यापुढेही त्यांना त्यांची जागा ही आपण सर्वजण मिळून दाखवून देणार आहोत.
मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून होत असलेले काम हे जनतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे. निळवंडेचे पाणी असेल किंवा नदीजोड प्रकल्प असेल या माध्यमातून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करण्याबाबत योग्य तो निर्णय होणार आहे. सहकाराचे खाजगीकरण होऊ नये सहकार टिकला पाहिजे. यासाठी लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील हे कायमच आग्रही होते आणि हेच काम मंत्री विखे पाटील करत आहेत.
त्यामुळे आज विखे पाटील कारखाना हा सक्षमपणे उभा आहे. प्रवरा हे कुटुंब एकत्र आहे. सेवानिवृत्तीनंतर आपले जीवन सुखकर व्हावेत यासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी विखे पाटील फाउंडेशनचे डाॅ. विखे पाटील हाॅस्पीटल विळद आणि विमा कंपनीच्या माध्यमातून आपल्या आरोग्याची ही घेतली जाईल असेही असेही डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.
यावेळी साखर कामगार सभेचे ज्ञानदेव आहेर यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत असतानाच विखे पाटील कुटुंबाने कामगारांची घेतलेली काळजी हे महत्वपूर्ण ठरली आहे. या माध्यमातून त्यांना योग्य असा न्याय देण्याचा प्रयत्न नेहमीच विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून आणि कारखान्याच्या माध्यमातून झाला आहे. आज कामगारांची मुले - मुली शिक्षणांतून जागतिक पातळीवर हे केवळ मंत्री विखे पाटील यांच्यामुळे शक्य झाले असे त्यांनी सांगितले.
यावेळी कैलास तांबे, संजय मोरे यांचीही भाषणे झाली. दरम्यान याप्रसंगी सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार, कामगार अपघात विमा आणि मयत सभासद विमा योजनेचे धनादेशही वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार उपाध्यक्ष सतीश ससाणे यांनी मानले.