संगमनेरचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी नागरिकांचे ठिय्या आंदोलन
◻️ माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गा तांबे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणला दिले निवेदन
संगमनेर LIVE | लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने विविध विकासाच्या योजना राबवून अत्यंत वैभवशाली व सुरक्षित शहर म्हणून संगमनेरची राज्यात ओळख निर्माण झाली आहे. मात्र मागील काही दिवसांपासून महावितरण कार्यालयाकडून सातत्याने अनियमित, खंडित होणारा वीजपुरवठा केला जात असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांचा रोष वाढत असून तातडीने यावर उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी आज नागरिकांनी एमएसईबी कार्यालयाला निवेदन दिले.
संगमनेर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गा तांबे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी आजी माजी पदाधिकारी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर शहर व परिसरात अनियमित वीजपुरवठा केल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. अनियमित वीज पुरवठा, कमी किंवा जास्त होल्टेजची समस्या, तुटलेल्या तारा व अनेक रहदारीच्या ठिकाणी विजवाहक तारांना पडलेला झोळ, तसेच अनेक नागरिकांच्या घराजवळून गेलेल्या मेन लाईनच्या हाय व्होल्टेज लाईनच्या वीज वाहकतारांना संरक्षण कवच नसल्याने जीवित व मनुष्यहानी होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी पोल दुरुस्तीची कामे रखडली आहे. या समस्यांमुळे सामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः शहरी व ग्रामीण भागामध्ये वीज पुरवठा वेळेवर न होणे तसेच तांत्रिक समस्या दीर्घकाळ प्रलंबित राहणी ही चिंताजनक बाब आहे. याबाबत अनेक वेळा तक्रार देऊनही वीज वितरण कंपनीकडून त्याची दखल घेतली जात नाही. याबाबत महावितरण कंपनीकडून त्वरित पाऊले उचलने गरजेचे आहे.
महावितरण कार्यालयाने पुढील ८ दिवसात या सर्व समस्यांचे निराकरण करावे. संगमनेर विभागासाठी एक स्वतंत्र हेल्पलाइन नंबर २४ तास कार्यरत सुरू करावा. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
खंडित होणारा वीजपुरवठा ही चिंतेची बाब..
मागील सहा महिन्यांपासून संगमनेर शहरासह ग्रामीण भागात विजेचा प्रश्न ऐरणीवर आहे. महावितरण या गोष्टीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, दुर्दैवाने तसे होत नाही. तालुक्यात सध्या असुरळीत वीज पुरवठा सुरू आहे. विचारणा केल्यास याबाबत उडवा उडवीची उत्तरे अधिकारी देत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. यावर तातडीने मार्ग काढावा अन्यथा तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरून महावितरण कार्यालय विरोधात तीव्र निषेध आंदोलन करतील असा इशाराही सौ. दुर्गा तांबे यांनी दिला.