विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कला-क्रीडा महोत्सव घेणार - आमदार खताळ
◻️ वडगाव लांडगा व चिखली येथे शालेय हस्ते साहित्य आणि गणवेशाचे वाटप
संगमनेर LIVE | प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही कौशल्य असते, त्यास योग्य संधी दिली तर तेच सरकारी अधिकारी डॉक्टर, इंजिनिअर, खेळाडू अथवा कलाकार बनू शकतील. त्यासाठी त्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी तालुका स्तरीय कला - क्रीडा महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा आमदार अमोल खताळ यांनी केली.
संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा शाळेतील नवीन विद्यार्थ्याची पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात आणि लेझीमच्या निनादात गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी स्वतः काही काळ ट्रॅक्टर चालवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
आमदार खताळ म्हणाले की, वडगाव लांडगा शाळेने कायमच आपली गुणवत्ता जपली आहे म्हणून आज या शाळेतील अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहे ही एक अभिमानाची गोष्ट आहे. शिक्षणाचा पहिला दिवस हा केवळ शाळा सुरू होण्याचा दिवस नसून तो विद्यार्थ्याच्या आनंदाचा दिवस असतो. शासनाकडून शालेय साहित्य, गणवेश, मध्यान्ह भोजन, आरोग्यसेवा मोफत दिली जात आहे. मात्र या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याना शिक्षकांनीही गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.
आपल्या वाढदिवसानिमित्त हार-तुरे वा पुष्पगुच्छ न आणता विद्यार्थ्यासाठी शालेय साहित्य द्यावे, असे आवाहन आ. अमोल खताळ यांनी कार्यकर्त्याना केले होते. त्यानुसार गोळा झालेल्या वह्या व साहित्याचे वाटप वडगाव लांडगा येथील विद्यार्थ्यांना करण्यात आले. उर्वरित सर्व साहित्य तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवले जाणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.