आश्वी बुद्रुक सेवा सोसायटीच्या संचालकपदी वेणुनाथ गायकवाड यांची वर्णी
◻️ एका जागेसाठी झालेल्या पोट निवडणुकीत रिक्त जागा माजी मंत्री थोरात यांच्या पारड्यात
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या रिक्त झालेल्या एका संचालक पदाच्या जागेसाठी पोट निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. यावेळी चुरशीच्या झालेल्या मत प्रक्रियेत मंत्री विखे पाटील आणि माजी मंत्री थोरात समर्थक उमेदवारांना सम - समान मते मिळाल्यानंतर देव चिठ्ठी टाकून झालेल्या निर्णयात बाळासाहेब थोरात यांचे समर्थक वेणुनाथ तात्याबा गायकवाड यांची संचालकपदी वर्णी लागली आहे.
आश्वी बुद्रुक येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील समर्थक गटाची सत्ता आहे. यामध्ये १३ संचालकापैकी मंत्री विखे पाटील गटाचे कैलास सहादु मुळे यांचे अपघाती निधन झाले होते. त्यामुळे सेवा सोसायटीच्या रिक्त झालेल्या जागेवर दिवंगत कैलास मुळे यांचे मोठे बंधु राजेंद्र सहादु मुळे यांची बिनविरोध निवड करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. मात्र, आजी आणि माजी मंत्र्यांच्या समर्थकांमध्ये यावर एकमत झाले नाही. गुरूवारी (दि. २६) एका जागेसाठी संगमनेर येथील उपनिबंधक कार्यालयात निवडणुक अधिकारी राजेद्र वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोट निवडणूक प्रक्रिया पार पडली.
यावेळी मंत्री विखे पाटील गटाकडुन राजेंद्र मुळे यांनी तर, थोरात गटाकडुन सेवानिवृत्त शिक्षक वेणुनाथ गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर झालेल्या मतदानात दोन्ही उमेदवारांना सम - समान मते मिळाल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला. त्यानंतर देव चिठ्ठी व्दारे संचालक निवडीची प्रक्रिया पार पडली असता, वेणुनाथ गायकवाड यांना नशीबाची साथ मिळाली आणि त्यांचे नाव चिठ्ठीत निघाल्यामुळे त्यांची संचालक पदी वर्णी लागली आहे.
आमचे एक संचालक आजारी असतानाही मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी हजर होते. आजच्या निकालाचा विकास कामांवर कोणताही परिणाम होणार नाही. भविष्यात देखील विखे पाटील कुटुंबिय आणि सेवा सोसायटीच्या माध्यमातून सभासदासह शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील.
विजयराव म्हसे, संचालक
डॉ. पद्मश्री विखे पाटील कारखाना, प्रवरानगर