आश्वी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ संपन्न
◻️ जिल्हाधिकाऱ्यासह प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांची उपस्थिती
◻️ पाचशे पेक्षा जास्त नागरीकांनी घेतला शिबिराचा लाभ
संगमनेर LIVE (आश्वी) | महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून ‘गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण’ अंतर्गत मंडळ स्तरावर ‘श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ राबविण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. त्यानुसार संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक मंडळात हे शिबिर नुकतेच राबविण्यात आले.
जिल्हाधिकारी पंकज अशिया, प्रांताधिकारी अरुण उंडे, तहसिलदार धीरज मांजरे, नायब तहसिलदार संदीप भांगरे, पुरवठा अधिकारी सातपुते, वैद्यकीय अधिकारी डाॅ. तैय्यब तांबोळी हे बुधवारी (दि. २५) पार पडलेल्या शिबिराप्रसंगी उपस्थितीत होते.
यावेळी ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांना रहिवाशी, उत्पन्न व जातीचे दाखले, रेशन कार्ड यांचे वाटप, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान योजना आदी सामाजिक लाभाच्या योजना सह सात-बारा वाटप, प्रलंबित फेरफार नोंदी निर्गत करणे व विविध शासकीय योजनासाठी लागणारे दाखले याबाबत माहिती देण्यात आली. याप्रसंगी साई मंगल कार्यालयात आयोजित शिबीरात परिसरातील गावातील किमान पाचशे लाभार्थ्यानी लाभ घेतला.
यावेळी रेश्मा वसंत मुन्तोडे, काळुराम बोन्द्रे, आण्णा मुन्तोडे, बाळासाहेब मुन्तोडे, किशोर मुन्तोडे या पाच घरकुल लाभार्थ्याना प्रातिनिधिक स्वरुपात पाच ब्रास वाळुचे पत्र देण्यात आले. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ उपस्थित लाभार्थ्यानी घेतला आहे. दरम्यान हे शिबीर यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी ज्योती ससे, तलाठी बाबासाहेब बोऱ्हाडे, सूर्यकांत रणशुर, विक्रम ओतारी, महेश वर्पे, महसुल सेवक सोमनाथ गाडेकर, बापूसाहेब बर्डे, संदीप तांबे यांच्यासह संबंधित खात्याच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
शासनाने दाढ बुद्रुक शिवारात माजी सैनिक म्हणून इनाम दिलेल्या जमिनीत जाण्या - येण्यासाठी रस्ता नव्हता. हा प्रश्न अनेक वर्षापासुन प्रलंबित होता. आज झालेल्या या शिबिरात या रस्त्याची महसुल दप्तरी नोंद करून आदेश व सातबारा उतारे मिळाले आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने या अभियानाला दिलेले ‘छत्रपती शिवाजी महाराजाचे’ नाव सार्थक झाले आहे.
जनार्दन भिमाजी फड (वय - ८०) माजी सैनिक, प्रतापपूर ता. संगमनेर