संगमनेर येथे शिवसेनेकडून (उबाठा) हिंदी भाषेच्या शासन निर्णयाची होळी
◻️ महाराष्ट्रात मराठीचं! मराठीचा दुस्वास खपवून घेणार नाही- अमर कतारी
संगमनेर LIVE | महाराष्ट्र राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने इयत्ता पहिली ते पाचवी वर्गामध्ये तृतीय भाषा म्हणून हिंदी भाषेचा शासन निर्णय लागू केला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार हा विषय सक्तीचा नसून ऐच्छिक असल्याचे सांगितले गेले. तरी, वर्गातील किमान २० विद्यार्थ्यानी एकत्रित येऊन ‘हिंदी नको’ अशी इच्छुकता दर्शवल्यास इतर भाषा उपलब्ध करुन देण्यात येईल. असा संभ्रम निर्माण करणारा निर्णय राज्य सरकार कसा घेऊ शकते? त्यामुळे मराठीचा दुस्वास खपवून घेणार नाही. असे शिवसेनेचे (उबाठा) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी म्हटले आहे.
संगमनेर शहर बस स्थानक परिसरात सरकारच्या हिंदीच्या निर्णयाची शिवसैनिकांनी (उबाठा) होळी केली. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
अमर कतारी पुढे म्हणाले की, हा महाराष्ट्र मुंबईसह स्वाभिमानाने मिळवण्यासाठी १०५ हुतात्म्यांनी प्राणाचे बलिदान दिले. मराठी अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी हिंदू हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी अतोनात परिश्रम केले. त्याच राज्यात मराठी भाषेचा होणारा दुस्वास आम्ही कसा खपवून घेऊ? महाराष्ट्राच्या व्यवस्थेवर हळूहळू हिंदी लादून मराठी भाषिकांवर दबाव निर्माण करण्याचे हे षड्यंत्र असून महाराष्ट्रात फक्त मराठीचेच प्राधान्य राहील. प्राथमिक शालेय शिक्षणात हिंदी विषय सक्तीचा किंवा ऐच्छिक वरून संभ्रम निर्माण करुन सरकारने मराठी भाषिकांच्या स्वाभिमानाशी खेळू नये अन्यथा ठाकरे बंधूंच्या मनोमिलनानंतर ही महाराष्ट्राची वज्रमूठ तुम्हाला अस्मान दाखवेल असा इशारा माजी शहर प्रमुखानी दिला आहे.
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात मुंबईत मराठी अस्मितेच्या सन्मानार्थ निघणारा महामोर्चा हा मराठीजनांची ताकद काय असते? हे महाराष्ट्र दाखवून देईल. असे युवासेना जिल्हा प्रमुख अमित चव्हाण आणि शहर संघटक असिफ तांबोळी यांनी म्हटले.
महाराष्ट्रात शेकडो वर्षांपूर्वी गुजराती, मारवाडी, राजपूत, राजस्थानी आले किंवा शीख पंजाबी बांधव महाराष्ट्रात स्थलांतरीत झाले. ते मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झाले. स्वभाषा अभिमान राखत इतर भाषिय बांधवांनी मराठीला तेवढाच दर्जा आणि प्रेम दिले. असे मत युवा सेना शहर प्रमुख गोविंद नागरे व उपतालुकाप्रमुख सचिन साळवे यांनी व्यक्त केले.
उत्तर भारतातील काही मुजोर आणि मराठीचा दुस्वास करणाऱ्या नागरिकांच्या लांगूलचालनासाठी एवढ्यात ‘महाराष्ट्राचे हिंदीकरण’ करण्याचा घाट घातला जातोय का असा सवाल उपस्थित शिवसैनिक युवा सेना जिल्हा समन्वयक फैसल सय्यद आणि विधानसभा प्रमुख अमोल डुकरे यांनी व्यक्त केला. यावेळी मुस्लिम मावळा अजीज मोमीन यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
याप्रसंगी अमर कतारी, अमित चव्हाण, फैसल सय्यद, गोविंद नागरे, अमोल डुकरे, अजिज मोमीन, असिफ तांबोळी, सचिन साळवे, विजय सातपुते, भाऊसाहेब वराळे, प्रकाश गायकवाड, अमित फटांगरे, प्रंशात खजुरे, नितिन गुंजाळ, भोला पवार, सचिन खिच्ची, शुभम काळे, महेश कतारी, दशरथ पवार, सागर कतारी, गौतम खिच्ची, करण सदमाके यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.