नगरपालिकेतील भ्रष्ट ठेकेदारांची चौकशी करून कारवाई करा - आमदार अमोल खताळ
◻️ शहरातील दिल्ली नाका येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन संपन्न
◻️ शहरातील एसटीपी प्लांट इतरत्र हालविण्याची दिली ग्वाही
संगमनेर LIVE | संगमनेर नगरपालिकेत अनेक वर्षांपासून कचरा व्यवस्थापन, गटारी स्वच्छता आणि रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून दोषी ठेकेदारांविरुद्ध कारवाई करा. असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्याना दिले.
शहरातील दिल्ली नाका येथे नागरी दलीतेत्तर वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत दिल्ली नाका परिसरात भूमिगत गटार काँक्रिटीकरण सुधारणा तसेच सर्व्हिस रोड तयार करणे कामाचे भूमिपूजन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ पुढे म्हणाले की, गेल्या ३० वर्षांपासून नगरपालिकेवर त्यांची सत्ता होती. तेव्हा गटारीचे आणि रस्त्याच्या कामाचे ठेके त्यांच्या ठेकेदाराला दिले. मोर्चा काढायला सुद्धा तेच ठेकेदार पुढे होते. संगमनेर नगरपालिकेत त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याने या बाबतची माहिती माझ्या कार्यालयात द्या. त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर बैठक घेऊन भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्यास भाग पाडू. अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
दिल्ली नाका परिसरात होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सर्विस रस्ता होणे गरजेचे आहे असा आग्रह आपण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे धरला होता. त्यांनी तात्काळ नागरी दलीतेत्तर वस्ती सुधार योजनेतुन १ कोटी ५१ लाख ६९ हजार रुपये मंजूर केले या निधीतून कामाची सुरुवात करण्यात आली आहे. ठेकेदाराने हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देश दिले.
‘न खाऊंगा, ना खाने दूंगा’ ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. तीच भूमिका आपण संगमनेर येथील विकास कामांबाबत घेतली आहे. ठेकेदाराने हे काम वेळेत पूर्ण करावे. या कामांचा दर्जा उत्तम राहील याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष द्यावे. मला माझ्या कुटुंबातील कुणाला राजकारणात आणायचे नाही. मला फक्त लोकांचे प्रेम आणि विश्वास हवा आहे. त्यामुळे विकास कामे चांगल्या दर्जाची करा अशा सूचना त्यांनी दिल्या.
एसटीपी प्लांट बाबत स्पष्ट केली भूमिका..
संगमनेर शहरात एसटीपी प्लांट उभा करण्याचा काहींनी घाट घातला. मात्र, तो प्लांट इतरत्र हलविण्यासाठी मी तुमच्याबरोबर राहील. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे निधी आणण्यासाठी आणि विकासाचा वेग साधण्यासाठी आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत विकासाभिमुख उमेदवार निवडून द्या. असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.