हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची नगर शहर शिवसेनेने (उबाठा) केली होळी
◻️ मंत्री लोणीकरांच्या प्रतिमा पायदळी तुडविल्या
◻️ महायुती सरकारने मराठी माणसाच्या स्वाभिमानावर केलेला हल्ला शिवसेना खपवून घेणार नाही - काळे
संगमनेर LIVE (नगर) | मराठी भाषा ही मराठी माणसाची अस्मिता आहे. शिवसेना सत्तेत असताना आम्ही प्रत्येक शाळेमध्ये मराठी सक्तीची केली होती. परंतु गुजरातच्या शेठजींच्या दावणीला बांधलेल्या राज्यातील महायुती सरकारने हिंदी ही तृतीय भाषा म्हणून इयत्ता १ ली ते ५ वी साठी सक्तीची केली आहे. हा महाराष्ट्र द्रोह आहे. मराठी माणसाच्या स्वाभीमानावर सरकारने केलेला हा हल्ला शिवसेना अजिबात खपवून घेणार नाही, असा घाणाघात ठाकरेंच्या शिवसेनेचे नगर शहर प्रमुख किरण काळे यांनी केला.
दिल्लीगेट येथे हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची होळी करून आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी महायुतीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. आंदोलनात काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस देखील सहभागी झाली. यावेळी काळे बोलत होते.
यावेळी कामगार सेनेचे नेते विलास उबाळे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अनिकेत कराळे, माथाडी कामगार सेना शहर प्रमुख गौरव ढोणे, युवा सेना विधानसभा प्रमुख आनंद राठोड, सुनील भोसले, विकेश गुंदेचा, व्यापारी सेनेचे महावीर मुथा, अल्पसंख्यांक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, शिवसेना आयटी सेलचे सुजय लांडे, सावेडी शिवसेनेचे गणेश आपरे, मिलन सिंग, हाफिज सय्यद, रिक्षा युनियनचे शंकर आव्हाड, केडगाव शिवसेनेचे किशोर कोतकर, युवा सेनेचे किरण लांडे, शिवसेना सामाजिक न्याय विभागाचे विकास भिंगारदिवे, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषा भगत, महिला उपाध्यक्ष शैला लांडे, शिवसैनिक जयराम आखाडे, दीपक काकडे, श्रीकांत दंडवते, निखिल लाड, अनिकेत लांडे, बाबासाहेब वैरागर, राजेंद्र तरटे, सचिन भालेराव, विनोद शिरसाट आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा म्हणाले, महाराष्ट्राला गुजरातच्या दावणीला बांधण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अनिकेत कराळे म्हणाले, आधी मराठी माणसाच्या हाताचा रोजगार यांनी पळवला. आता हिंदीचे आक्रमण हे महाराष्ट्र द्रोही करू पाहत आहेत. मराठी माणूस हा डाव मात्र यशस्वी होऊ देणार नाही.
शिवसेनेचा त्रिसूत्री कार्यक्रम..
शहर ठाकरे शिवसेनेच्या वतीने किरण काळे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात त्रिसूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. पहिल्या टप्प्यात शासन निर्णयाची होळी करून आंदोलन छेडण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यात नागरिकांच्या स्वाक्षरीने निर्णयाला विरोध करणारे ५ हजार पत्र राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात शहरातील कवी, साहित्यिक यांच्या भेटी घेत या राज्यव्यापी जन आंदोलनात सहभागी होण्याच्या आवाहन केले जाणार आहे.
शहर लोकप्रतिनिधींनी भूमिका स्पष्ट करावी..
मनसे, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या सह अनेक घटक पक्ष, संघटना, मराठी अभ्यास मंडळं यांनी मराठीच्या रक्षणासाठी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार सांगणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भूमिकेला विरोध करणारी भूमिका घेणाऱ्या शहराच्या लोकप्रतिनिधींनी हिंदी सक्ती बाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे जाहीर आवाहन किरण काळे यांनी केले आहे. त्यांनाही हिंदी सक्तीचा पुळका आला असेल तर त्यांनी महाराष्ट्रात न राहता गुजरात मध्ये जाऊन राहावे, असा खोचक सल्ला देखील काळे यांनी दिला आहे.
मंत्री लोणीकरांची प्रतिमा पायदळी तुडवली..
शेतकरी विरोधी वक्तव्य करणाऱ्या मंत्री बबनराव लोणीकर यांची प्रतिमा शिवसैनिकांनी पायदळी तुडविल्या. कोणत्याही निवडणुका नसताना सत्तेत आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख तथा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्षणात राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. मात्र आमच्या बळीराजाची अवहेलना करणारं वक्तव्य हे सत्तेतल्या मंत्र्यांना आलेला माज दाखवत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जनता यांना त्यांची जागा दाखवून देईल, असा घाणाघात यावेळी किरण काळेंनी केला.