कै. बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलेले स्वप्न आज साकार होत आहे - डॉ. सुजय विखे

संगमनेर Live
0
कै. बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलेले स्वप्न आज साकार होत आहे - डॉ. सुजय विखे

 

◻️ नारायणगव्हाण येथे कुकडी कालव्याचे विशेष अस्तरीकरण कामाचा शुभारंभ



संगमनेर LIVE (सुपा) | पारनेर तालुक्याच्या जिरायत भागासाठी कै. बाळासाहेब विखे पाटील यांनी जे स्वप्न पाहिले होते, ते आज जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून पूर्णत्वास येत आहे. ते स्वप्न सत्यात उतरत असल्याचा आनंद होत असल्याची भावना माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केली. 

तालुक्यासाठी पाण्याचा जो शब्द बाळासाहेब विखे पाटील यांनी दिला होता, तो शब्द जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे पूर्ण करत आहेत. सत्ता आणि पद यांचा उपयोग चांगल्या कामासाठी करून जनतेची सेवा करण्याचे बहुमूल्य काम नामदार साहेबांच्या हातून घडत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथे महाराष्ट्र सुधारणा कार्यक्रमांतर्गत कुकडी कालव्याचे विशेष अस्तरीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी डॉ. सुजय विखे बोलत होते.

डॉ. सुजय विखे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत जे काही अपवाद घडले, त्यातून आपल्याला शिकायला हवं. शेवटी लोकांनी दिलेला निर्णय मान्य करून आम्ही पुढे चालत आहोत. अनेक गावांतील मागण्या नव्याने समोर आल्या आहेत. यामध्ये जातेगाव व पळवे गावाचा समावेश उपसा सिंचन योजनेच्या सभेमध्ये केला जाईल. उपसा सिंचन सर्व्हेचे सर्वेक्षणाचे काम आता काही दिवसातच सुरू होईल असा विश्वास देखील डॉ. सुजय विखे यांनी उपस्थितानं दिला. 

तसेच पाण्याचे नियोजन न करता जर वाटेकरी वाढले तर कोणताही घास शिल्लक राहणार नाही. त्यामुळे जलसिंचनाच्या योजनांमध्ये आपल्याला काळजीपूर्वक पावले उचलावी लागतील असे देखील ते म्हणाले. मी पराभूत झालो तरी नागरिकांना दिलेला शब्द मी पूर्ण केला व जे काम राहिलेले आहेत, ते देखील मी पूर्ण करत आहे. ९०० कोटींच्या साखळी योजनेसाठी प्रशासकीय मान्यता मिळण्याचे काम पुढच्या पंधरा दिवसात पूर्ण करणार असल्याची ग्वाही डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली आणि ही कामे फक्त आम्हीच करू शकतो असं देखील ठणकावून डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना खुले आव्हान केले आहे की, आपण लोकसभेला व विधानसभेला जो शब्द दिला होता, तो सत्यात उतरवला आहे का? आपण रेकॉर्डिंग करून लोकांना जो शब्द दिला होता तो पूर्ण झाला आहे का? असे प्रश्न उपस्थित करून खासदार निलेश लंके यांच्यावर त्यांनी टीका केली. तसेच ते पुढे म्हणाले की, दिलेले शब्द पूर्ण करण्याची ताकद फक्त विखे पाटील कुटुंबामध्ये आहे आणि ती आम्ही वेळोवेळी सिद्ध देखील केली आहे.  

पारनेर तालुक्याच्या शेतकऱ्यांना पाण्यासाठी आता कोणाशीही भांडण्याची गरज भासणार नाही. कारण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून कुकडी असेल पठार भागातील उपसा सिंचन योजना असेल अशा विविध योजना मार्गी लागण्याचे काम झपाट्याने होत आहे. काही लोक टीका करतील त्यांना परमेश्वर सद्बुद्धी देवो, आमचं काम सुरू आहे. केवळ आश्वासनांवर जगणाऱ्या तालुक्याला आता प्रगतीचे आणि विश्वासाचे राजकारण हवे, असे देखील सुजय विखे पाटील यांनी सांगितले व माझी एवढीच विनंती आहे की, कोणत्याही आश्वासनाला बळी पडू नका. मी सांगतो फोटो नाही काढणार, व्हिडिओ पण नाही काढणार, पण पाणी तुम्हाला आम्हीच देणार असा देखील शब्द यावेळी त्यांनी दिला. 

तसेच त्यांनी बोलताना स्पष्ट केले की, येथे अनेक नवे चेहरे आले आहेत. काहींनी माझ्या विरोधात मतदान केले असेल, पण हरकत नाही. आता नव्याने सुरुवात करूया. तालुक्याला न्याय देण्याचे काम आपण सगळ्यांनी मिळून करूया असे साध्य करून विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत अशी ग्वाही देखील दिली. तसेच शब्द दिला तर तो पूर्ण करणारच असेही त्यांनी यावेळी उपस्थितांना सांगितले.

यावेळी विश्वनाथ कोरडे, सुजित झावरे, प्रशांत गायकवाड, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात, भाजपा तालुका अध्यक्ष राहुल शिंदे, विक्रम सिंह कळमकर, गणेश शेळके आदी मान्यवर, ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान आमदार काशिनाथ दाते, सुजित झावरे, विश्वनाथ कोरडे व गणेश शेळके यांची भाषणे देखील यावेळी झाली.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !