संगमनेर शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणणार - आमदार अमोल खताळ
◻️ नगर पालिकेच्या अग्निशमन वाहनाचे आमदार खताळ यांच्या हस्ते लोकार्पण
संगमनेर LIVE | संगमनेर नगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यानी कामाला लागावे. नगर विकास विभाग हा उप मुख्यमंत्री व नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत असून त्यांचे संगमनेरवर विशेष प्रेम आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून संगमनेर शहराच्या विकासासाठी भरीव निधी आणणार आहे. अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
महाराष्ट्र अग्निशमन सुरक्षा अभियानां अतर्गत संगमनेर नगरपालिकेला नवीन अग्निशामक (गुरखा) मिनी रेस्क्यू अग्निशमन वाहन मिळाले असून त्या वाहनाचा लोकार्पण सोहळा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पार पडला. याप्रसंगी नगरपालिकेचे अधिकारी तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ पुढे म्हणाले की, संगमनेर शहरात अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद आहे. त्यात एखादा अपघात घडल्यास अशा वाहनांची गरज भासते आणि आता हे वाहन वेळेवर पोहोचून नागरिकांचे प्राण वाचवू शकेल. संगमनेरमध्ये विकास कामे करत असताना अनेक अडथळे येतात तर, काही जण अफवा पसरवितात. मात्र, मी त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. केंद्रात, राज्यात व तालुक्यात महायुतीचे सरकार असल्यामुळे तुम्हाला कोणाकडूनही त्रास होणार नाही.
नगरपालिकेत येणाऱ्या सर्वसामान्य लोकांची कामे झाली पाहिजे, यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची शिफारस न घेता नगरपालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा. मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी अल्पावधीतच यांनी संपूर्ण शहरात शिस्तीचे वातावरण निर्माण केले आहे. मात्र काही माजी नगरसेवक अजूनही सत्ता असल्याच्या थाटात वागत आहेत. यावर उपाययोजना करा असे सक्त निर्देश आ. खताळ यांनी मुख्याधिकाऱ्याना दिले.
नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी नव्याने दाखल झालेल्या अग्निशमन वाहनाचा उपयोग, त्याचे कार्यक्षेत्र आणि भविष्यातील बचाव कार्यातील भूमिका याविषयी सविस्तर माहिती दिली.
दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक राजेश गुंजाळ यांनी केले. तर आभार प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे यांनी मानले आहेत.