संगमनेर तालुक्यातील सात शाळांना ८७ लाख ५० हजार रुपये निधी
◻️ आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा परिषदेच्या शाळा सक्षम होणार
माजी मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा सहकार, शिक्षण, व्यापार, शेती यांसह विकास कामांमध्ये राज्यात अग्रगण्य म्हणून ओळखला जातो. शिक्षण ही समाजाच्या प्रगतीचे महत्त्वाचे माध्यम असल्याने ग्रामीण शिक्षणावर अधिक भर देण्याकरता माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विविध योजना राबवल्या आहेत.
हाच वारसा पुढे नेताना आमदार सत्यजित तांबे यांनी संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सह विविध शाळांमध्ये विविध योजनांच्या माध्यमातून निधी देऊन सुविधा निर्माण करून दिले आहेत. याचबरोबर नव्याने जिल्हा नियोजन समितीतून जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत तालुक्यातील सात शाळांना प्रत्येकी १२ लाख ५० हजार रुपयांचा निधी दिला आहे.
या निधी अंतर्गत पोखरी हवेली, पेमगिरी, येळोशी, पारेगाव, समनापुर, मालदाड, घोडमाळ वस्ती, तळेगाव दिघे येथील जिल्हापरिषद शाळांना निधी मिळाला आहे. त्यातून शाळा खोल्या इमारतींची कामे केली जाणार आहे. शाळांना हा निधी मिळवून दिल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी आमदार तांबे यांचे आभार मानले आहे.
प्रत्येकाच्या प्रगतीमध्ये शिक्षणाचे मोठे योगदान असून प्राथमिक शिक्षण हा पाया आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून अनेक गुणवंत विद्यार्थी निर्माण होत आहे. यासाठी चांगल्या सुविधांसह नवीन तंत्रज्ञानाचा वापरही जिल्हा परिषद शाळेमध्ये केला गेला पाहिजे. यासाठी शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळेंना व प्राथमिक शिक्षणासाठी अधिकचा निधी दिला पाहिजे. भाषेवर वाद करण्यापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळण्यासाठी आपला सातत्याने प्रयत्न असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी म्हटले.