सौ. दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली अस्वच्छते विरोधात नागरिकांचा एल्गार
◻️ संगमनेर शहरातील वाढलेल्या अस्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
◻️ राज शिष्टाचाराचे पालन करा, अन्यथा नगरपालिकेला टाळे ठोकू
संगमनेर LIVE | सततच्या विकास कामांतून वैभवशाली ठरलेल्या संगमनेर शहरात नगरपालिकेने स्वच्छ शहर, सुंदर शहर ही संकल्पना राबवत राज्य व देश पातळीवर स्वच्छतेचे विविध पारितोषिक मिळवली. संपूर्ण शहर हिरवे आणि स्वच्छ ठेवले. मात्र मागील तीन वर्षापासून प्रशासनाच्या कारभारामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता वाढली असून या विरोधात नागरिकांनी नगर परिषदेवर एल्गार मोर्चा काढला.
माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मधील सर्व प्रभागातील नागरिकांनी शहरातील वाढत्या अस्वच्छतेबाबत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, नितीन अभंग, गणेश मादास, सौ. प्रमिला अभंग, ॲड. प्रमोद कडलग, निखिल पापडेजा, मुस्ताक शेख, वैष्णव मुर्तडक, मनोज यंगदाल, राजेंद्र वाकचौरे, मिलिंद औटी, सुरेश झावरे, लक्ष्मण बर्गे, वैशाली बर्गे, सुविधा आरसिद्ध, अनिता साळवे, अंबादास आडेप, योगेश जाजू, सुभाष दिघे, स्वप्निल गुंजाळ, मिश्रा भाबी, सचिन खाडे, किशोर बोराडे, प्रमोद गणोरे, सचिन वामन, नूर मोहम्मद खान, डॉ. दानिश पठाण, सागर कानकाटे, अक्षय गुंजाळ, विजय पांढरे, शैलेश कलंत्री, गजेंद्र अभंग, सौदामिनी कान्होरे, सुनीता कांदळकर, विशाल वैराळ आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, संगमनेर शहरांमध्ये गाई, कुत्री, डुकरे मोकाट फिरत असून त्यामुळे अपघात व स्वच्छता वाढली आहे. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होत नाही. शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहे. ते वेळेवर उचलले जात नाही. घंटागाडी वेळेवर येत नाही. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली असून डासांचे प्रमाण खूप वाढले आहे. डेंगू, मलेरिया सारखे आजारांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. मात्र याबाबत प्रशासन उदासीन आहे.
यावेळी बोलताना सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, संगमनेर नगर परिषदेला मागील दहा वर्षामध्ये स्वच्छता व चांगल्या कामामुळे राज्य व राष्ट्रीय पातळीवर सुमारे दहा कोटींची विविध पारितोषिके मिळाली आहे. यातून शहरातील रस्ते गार्डन विकास कामे करता आली. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विविध विकासाच्या योजना राबवल्या. याचबरोबर कुंभमेळा योजनेतून त्यांनी म्हाळुंगी नदीच्या बाजूने रिंग रोड तयार करून घेतला. स्वच्छ शहर सुंदर शहर ही संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबवली यामध्ये नागरिकांचाही मोठा सहभाग राहिला.
ओला कचरा व सुक्या कचऱ्याचे चांगले व्यवस्थापन झाले. मात्र मागील तीन वर्षांपासून नगरपालिकेत प्रशासन असून राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या मर्जीनुसार ते काम करत आहे. शहरांमध्ये अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कचरा डेपो चा डोंगर झाला आहे. ठिकठिकाणी कचरा साठला आहे. म्हाळुंगी नदीच्या काठावर अस्वच्छतेचा कहर झाला आहे.
प्रशासनाचे कोणतेही लक्ष नाही. स्वच्छतेच्या बाबतची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने संपूर्ण स्वच्छतेकडे लक्ष द्यावे कारण. या अस्वच्छतेमुळे डेंगू मलेरिया यांचं सह विविध साथींचा आजाराचा मोठा धोका निर्माण झाला आहे. याचबरोबर उंदीर, घुशी, मच्छर हे नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने स्वच्छतेचे उपाय करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी विविध महिलांनी अस्वच्छतेबाबत प्रशासना विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला. नगरपालिकेचे मुख्याधिकारी बाहेरगावी असल्याने दूरध्वनी द्वारे त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर ही निवेदन डेपोटी मुख्याधिकारी संजय टेकळे, प्रशांत जुन्नरे, राजेंद्र गुंजाळ, अमजद भाई यांनी स्वीकारले.
विधान परिषद सदस्यांबाबत राज शिष्टाचाराचे पालन करा अन्यथा नगरपालिकेला टाळे ठोकू..
महाराष्ट्र विधान परिषद हे महाराष्ट्रातील वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहाचे सदस्य नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे हे संगमनेर शहरातील आहे. नगरपालिकेच्या विविध विकास कामांच्या बाबत ज्यांना निमंत्रित करणे, सुचित करणे हे नगरपालिकेचे परम कर्तव्य आहे. मात्र राजकीय दबावातून जर नगरपालिका प्रशासन जाणीवपूर्वक त्यांना जर टाळत असेल तर हा राज्यघटनेचा आणि राजशिष्टाचाराचा पूर्णपणे अपमान असून स्वाभिमानी संगमनेरकर हे कधीही सहन करणार नाही. पुन्हा असे घडल्यास संगमनेर शहरातील सर्व नागरिक नगरपरिषदेला टाळे ठोकतील असा निर्वाणीचा इशारा माजी शहराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक यांनी नगरपालिका प्रशासनाला दिला आहे.