दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान - माजी मंत्री बाळासाहेब थोरात
◻️ संगमनेर तालुक्यात दररोज सुमारे ९ लाख लिटर दुधाचे उत्पादन
संगमनेर LIVE | दूध व्यवसायामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. हा व्यवसाय मोठा कष्टाचा आहे. संगमनेर तालुक्यामध्ये सुमारे ९ लाख लिटर दूध उत्पादन होत असून या व्यवसायामध्ये महिलांचे मोठे योगदान असल्याचे गौरवउद्गार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले.
तालुक्यातील आंबी खालसा येथील मुळेश्वर महिला सहकारी दूध उत्पादक संस्थेचा २५ वा रौप्य महोत्सव सोहळ्यानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख हे होते. कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग घुले, खांडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष लहानभाऊ गुंजाळ, मार्केट कमिटीचे सभापती शंकरराव खेमनर, अजय फटांगरे, सर्जेराव ढमढेरे, तसेच मुळेश्वर संस्थेच्या चेअरमन सौ. अलका ढमढेरे, व्हा. चेअरमन आरिफा शेख यांच्यासह सर्व संचालक मंडळ, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. याप्रसंगी सर्वाधिक दूध उत्पादन करणाऱ्या महिलांचा सत्कार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना माजीमंत्री थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा दुष्काळी तालुका होता मात्र स्वतःच्या विकास कामांमधून तालुक्याचा राज्यात लौकिक निर्माण झाला आहे. सहकारी संस्थांमुळे ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. राजहंस दूध संघ हा सहकारातील उत्कृष्ट दूध संघ आहे. सहकारी दूध संघांमुळे खाजगी दूध भाव देत आहेत. तालुक्यात दूध व्यवसाय मोठा असून दररोज सुमारे ९ लाख लिटर दुधाचे उत्पादन होत आहे. हा मोठा कष्टाचा व्यवसाय आहे. यामध्ये महिलांचे मोठे योगदान आहे.
रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाने कायम शेतकरी व दूध उत्पादक यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला आहे. दूध संघाने सातत्याने नवनवीन योजना राबवले असून मुरघास व एमडीएफ गोठा ही संगमनेरची संकल्पना राज्यामध्ये मॉडेल ठरली आहे. गुणवत्ता पूर्ण दूध उत्पादन करताना सर्व गाव पातळीवरील संस्थांनी ही आपला लौकिक टिकवला असून हा सहकार जपण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन केले.
अजय फटांगरे म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या सहकारामुळे संगमनेरच्या सहकाराचा पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. हा गौरव संगमनेर तालुक्यासाठी गौरवास्पद असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान यावेळी महिलांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे मान्यवरांचे स्वागत केले.