चिचंपूरचे अशोकराव थेटे हाकणार नगर जिल्ह्याची पाटीलकी!
◻️ नऊ पिढ्यांचा पाटीलकीचां वारसा लाभलेल्या अशोकराव थेटे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड
संगमनेर LIVE (आश्वी) | सांस्कृतिक, धार्मिक आणि समाजसेवेबरोबरचं नऊ पिढ्यांना पाटीलकीचां वारसा लाभलेल्या संगमनेर तालुक्यातील चिचंपूर येथील अशोकराव थेटे यांची पोलीस पाटील संघटनेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे अशोकराव थेटे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
नेवासे तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे नुकतीचं कामगार पोलीस पाटील संघटनेची राज्य आढावा बैठक राज्य अध्यक्ष शिवाजीराव कोलते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये वर्षभराचे नियोजन आणि पोलीस पाटलांच्या मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधणे या गोष्टींवर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी पोलीस पाटलांचे निवृत्तीचे वय ६० वर्षावरून ६५ वर्ष करण्यासाठी संघटनेचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारसोबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे. मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा चालू आहे. यावेळी संघटनेच्या वतीने नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणूक जाहीर करण्यात आल्या. याप्रसंगी अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदासाठी राज्य संघटनेचे सचिव महादेव भालेराव यांनी संगमनेरचे तालुका अध्यक्ष अशोकराव थेटे यांचे नाव सुचवले. त्यावर संघटनेत चर्चा होऊन राज्य अध्यक्ष शिवाजीराव कोलते यांच्यासह सर्वानुमते अशोकराव थेटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
अशोकराव थेटे हे संघटनेमध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय असून जिल्हास्तरावर त्यांची कामगिरी खूप चांगली आहे. अहिल्यानगरच्या सर्व तालुकाध्यक्षांनी त्यांचे निवडीचे स्वागत केले. संगमनेरचे तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष संघटनेचे काम केलेले आहे. त्यामुळे ते जिल्हाध्यक्ष पदाची कामगिरी समर्थपणे पार पाडू शकतील असा विश्वास यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तर, जिल्ह्यातील पोलीस पाटलांच्या न्याय व हक्कांच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहू. असे मत यावेळी नुतन जिल्ह्याध्यक्ष अशोकराव थेटे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी डॉ. दादासाहेब पाटील पवार, डॉ. महेंद्र बिडगर, वाघमारे, संतोष पवार, नितीन पाटील, प्रदीप चोळके, मधुकर बनसोडे, मुंडे, बाळासाहेब घुले, नामदेव वांढेकर, जमदाडे, महादेव जायभाय, पाचरणे, पंडित कुमार पवार, सुनील शिवणकर, आदिनाथ पाटील आदि तालुकाध्यक्षासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान अशोकराव थेटे यांची जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अशोकराव थेटे यांना नऊ पिढ्यांचा पोलीस पाटील वारसा लाभलेला आहे. त्यांनी बरेचं वर्ष संगमनेर तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी उत्कृष्ट रित्या पार पडली. या कार्यकाळात त्यांनी पोलीस पाटलांचे अनेक प्रश्न शासन दरबारी मांडण्याबरोबरोर व त्या सोडून घेण्यासाठी अथक प्रयत्न केले. संघटन कौशल्य या बळावर त्यांनी या संघटनेला मानाचे स्थान मिळवून दिले. त्यामुळे त्यांना सलग तेरा वर्ष तालुका अध्यक्ष पद सांभाळण्याची संधी मिळाली. त्यांच्या या कार्यकर्तृत्वामुळे त्यांच्यावर आता जिल्हाध्यक्ष पदाची मोठी जबाबदारी संघटनेने दिली आहे.